हिंदी चित्रपटांची सिक्वल्सची मक्तेदारी आता मराठी चित्रपटांनी मोडीत काढायची ठरवली आहे जणू. एखादा चित्रपट लोकोंना आवडला की त्याची कथा सिक्वलच्या माध्यमातून पुढे न्यायची हा राजमार्ग सध्या मराठीतही निर्माते-दिग्दर्शकांना खुणावू लागला आहे. गेल्याच आठवडय़ात दिग्दर्शक के दार शिंदे यांच्या अगं बाई अरेच्चा! या चित्रपटाच्या सिक्वलची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. २००४ साली आलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर क रून आहे. त्यामुळे ११ वर्षांनी येणारा या चित्रपटाचा सिक्वलही प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करणारच ना.. या चित्रपटासह मराठीत गाजलेल्या सहा चित्रपटांचे सिक्वल लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
‘अगं बाई अरेच्चा!’च्या सिक्वलमध्ये संजय नार्वेकरच्या जागी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मध्यवर्ती भूमिकेत आहे. सिक्वलमध्ये जुनीच कथा पुढे नेणारे चित्रपट कमी आहेत. कधी लोकांना चित्रपटाची संकल्पना आवडून जाते, तर कधी त्या व्यक्तिरेखा. मग त्या व्यक्तिरेखांना पुढे नेत एक पूर्ण नवीन कथा गुंफण्याचा प्रयत्न सिक्वलच्या माध्यमातून केला जातो. ‘अगं बाई अरेच्चा!’ प्रमाणेच सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई पुणे मुंबई’ चित्रपटाचा बहुचर्चित सिक्वलही यावर्षी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी या दोनच कलाकारांना घेऊन केलेली ही प्रेमकथा तरुणाईला फार आवडली होती. सिक्वलमध्ये ‘मुंबई पुणे मुंबई’चा पुढचा प्रवास काय आहे, हे अजून गुलदस्त्यात आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या अवधूत गुप्ते दिग्दर्शित ‘झेंडा’ या चित्रपटाच्या सिक्वलचीही तयारी सुरू झाली असल्याचे सूत्रांकडून समजते.
रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास’ या चित्रपटातच सिक्वलची जाहीर घोषणा होती. त्यामुळे प्राजक्ता आणि दगडूच्या पहिल्यावहिल्या प्रेमाचे काय होणार?, याची कथा ‘टाईमपास २’तून यावर्षी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हल्ली चित्रपट लोकांना आवडला रे आवडला की त्यांच्याकडूनच ‘पुन्हा एकदा’चा जयघोष होतो आणि मग निर्मात्यांनाही सिक्वलचा विचार करावा लागतो. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या श्रेयस तळपदे निर्मित आणि समीर पाटील दिग्दर्शित ‘पोश्टर बॉईज’ला तिकीटबारीवर चांगले यश मिळाले. त्यावेळी खरेतर चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचा विचार श्रेयसच्या मनात घोळत होता. मात्र, लोकांनी आग्रह केल्यानंतर सिक्वलचाही विचार सुरू झाल्याचे श्रेयसने सांगितले. ‘पोश्टर बॉईज’च्या सिक्वलमधील तीन नायकांनाच केंद्रस्थानी ठेवून पूर्ण नवीन कथा लिहिली जाणार असल्याचे त्याने सांगितले.