निर्मितीमूल्यात कोणतीही तडजोड न करण्यात आलेला आणि कोकणातील आजवर दुर्लक्षित राहिलेल्या नेत्रसुखद नैसर्गिक स्थळांवर चित्रीकरण झालेला ‘धमक’ हा चित्रपट निश्चितच नाशिककरांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास लेखक आणि दिग्दर्शक राजेंद्र बांदिवडेकर यांनी व्यक्त केला आहे. सुवर्णा बांदिवडेकर निर्मित हा चित्रपट २५ एप्रिलपासून नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्त पूर्वप्रसिध्दीसाठी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बांदिवडेकर बोलत होते.
मुहूर्तापासून धमक हा चित्रपट चर्चेत राहिला आहे. दमदार कथानक, मधूर गीत-संगित, दाक्षिणात्य शैलीतील साहसदृश्य,  मेघना-मुमैतचे नृत्य, निसर्गसौंदर्ययुक्त स्थळांवरील चित्रीकरण अशा कारणांमुळे हा चित्रपट चर्चेत राहिला असल्याची माहिती बांदिवडेकर यांनी दिली.
अनिकेत विश्वासराव या चित्रपटाचा नायक असून यातील आयटम गीत मेघना नायडूवर चित्रीत करण्यात आले आहे. तर लावणीवर मुमैत खानने बहारदार नृत्य सादर केले आहे.
संगीतकार निर्मलकुमार असून सर्व गीतांचे रिमिक्सिंग आणि मास्टरिंग लंडनमधील ग्लोब रेकॉर्डीग स्टुडिओत करण्यात आले असल्याने निर्मितीमूल्य आणि सादरीकरणावर विशेष भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.