मामाच्या गावाला जाऊया हे गाणं मराठी प्रेक्षकांच्या चांगल्याच परिचयाचे आहे. उन्हाळी सुट्टीमध्ये गावाला जाताना आणि त्यातही खासकरून आजोळी जाताना बच्चेकंपनी मामाच्या गावाला जाऊन काय काय धमाल करायची याचे मनोमन बेत आखत आली आहे. आताच्या पिढीतील बच्चेकंपनीला मामाच्या गावाला जाऊन करायच्या धमालीची गंमत ‘मामाच्या गावाला जाऊया’ हा चित्रपट दाखवतोच त्याचबरोबर मोठय़ांचेही स्मरणरंजन दिलखुलासपणे करतो. नितांतसुंदर छायालेखन, निसर्गभ्रमंतीची झलक, वाढत्या शहरीकरणामुळे शहरी माणूस काय गमावून बसलाय याचे दर्शन घडविण्याबरोबरच विशेषत: शहरी लहान मुलांमध्ये असलेला कृत्रिमपणा घालविण्याचा सजग आणि हळुवार प्रयत्न दिग्दर्शकाने जाणीवपूर्वक केला आहे.
लेखक-दिग्दर्शकाने मामाचा गाव दाखविताना कुठेही प्रचारकी धाटणी न वापरण्याचे भान ठेवूनही आजचा शहरी माणूस, त्याच्या जगण्यातली कृत्रिमता त्याचबरोबर आजची लहान मुले काय गमावत आहेत, त्यांच्या भावविश्वामध्ये नसलेल्या गोष्टी अचूक पद्धतीने दाखविण्याचा सहज प्रयत्न अतिशय चपखल मांडणी करत या चित्रपटातून केला आहे.
शहरातून आपल्या गावाकडे एसटीने निघालेल्या रघुनंदन देवकर ऊर्फ नंदूला बसमधील कंडक्टरसोबत तीन लहान मुलांवरून झालेल्या बाचाबाचीमुळे अध्र्या वाटेतच उतरावे लागते. ज्या बच्चेकंपनीवरून बाचाबाची झाली ती इरा, कुणाल आणि साहील या तिघांनाही कंडक्टर नंदूच्या सोबत उतरवतो. बस थांब्यावर एसटीच्या मागून धावत आलेली तेजस्विनी दुकले ऊर्फ तेजू एसटी चुकली म्हणून नंदूला शिव्या घालते. तो तिकडे दुर्लक्ष करतो. आजूबाजूला घनदाट जंगल, पुढची एसटी कधी येणार याचा कुणालाच थांगपत्ता नाही असे चित्र आहे आणि म्हणून कुणाल आपला भाऊ साहील व छोटी इरा यांना घेऊन जंगलात निघून जातो. मुले कुठे गेली या काळजीने तेजू दुकलेची बडबड सुरू होते म्हणून मुलांच्या मागे नंदू आणि त्याच्या मागे तेजू दुकले असे दोघेही जंगलातील पायवाटेने निघतात. नंदूसारखा गावठी तरुण आपल्या मागे येतो हे लक्षात आल्यावर मुले त्याच्या भीतीने पळत सुटतात आणि नंदू-तेजू त्यांचा पाठलाग करतात. नंतरचा संपूर्ण चित्रपट मुलांसोबत नंदू व तेजू हे तरुण-तरुणी जंगलातून योग्य वाट शोधून काढतात का यावर चित्रपट फिरतो. एका ‘सिक्रेट मिशन’वर निघालेल्या मुलांचे ‘सिक्रेट’ उलगडून दाखविण्याबरोबरच शहरात वाढलेली मुले, त्यांचे भावविश्व, गावरान नंदू आणि शिक्षिका असलेली व आसपासच्या गावातच राहणारी तेजू दुकले यांचे बंध कसे जुळतात, सगळे जण मिळून काय काय मजा करतात असे सारे चटपटीत संवाद, गोळीबंद पटकथा, अप्रतिम छायालेखन, उत्तम ध्वनी संकलन आणि संगीत या माध्यमातून दिग्दर्शकाने हलकेच उलगडून दाखविले आहे.
आजकालच्या शहरी बालगोपाळांना झाडावरून करवंद तोडून खाणे, विहिरीत किंवा छोटय़ा डोहात मनसोक्त डुंबण्याचा आनंद लुटणे, निसर्गाच्या चमत्काराचा अनुभव सहजपणे घेणे या गोष्टी दुरापास्त झाल्या आहेत. ‘व्हेकेशन कॅम्प’ आणि छंदवर्गाचा अतिरेकीपणा टाळून सहजपणे मुलांना निसर्गातील चमत्कारांची झलक दाखविण्याबरोबरच मोठय़ांनाही स्मरणरंजनाचा हळुवार अनुभव देतानाच नकळतपणे भाष्य करण्याची किमया दिग्दर्शकाने या चित्रपटातून केली आहे.
अभिजीत खांडकेकरने साकारलेला नंदू आणि मृण्मयी देशपांडेने साकारलेली तेजू दुकले यांच्याबरोबरच शुभंकर अत्रे, साहील मालगे, आर्या भरगुडे या बालकलाकारांचा सहजाभिनय हा या चित्रपटाचा आणखी एक विशेष म्हणता येईल. अर्थात मुलांकडून सहज अभिनय करून घेण्याची दिग्दर्शकाची हातोटी वाखाणण्याजोगी आहेच.
सबंध चित्रपट जंगलात चित्रित झाला असून अशा प्रकारचे चित्रण करणारा बहुधा हा दुर्मीळ मराठी चित्रपट म्हणता येईल. इंग्रजी माध्यमात शिकणारी आजची बच्चेकंपनी मराठीतले हल्ली न वापरले जाणारे शब्द ऐकते तेव्हा ‘ओ इट इज ए नाईस वर्ड’ असे उद्गार साहीलच्या तोंडून निघतात. लहान वयातच संगणक, मोबाइल, व्हिडीओगेम, टॅब या उपकरणांची सवय जडल्यामुळे आपण लहान असलो तरी ‘इंडिपेन्डण्ट’ झालो आहोत असे वाटणारा कुणाल या बच्चेकंपनीच्या व्यक्तिरेखांच्या उत्तम लेखनामुळे चित्रपट प्रेक्षकाला भिडतो. कोणताही आव न आणताही दिग्दर्शकाने अपेक्षित धरलेले मुद्दे प्रेक्षकांपर्यंत अतिशय सूक्ष्मपणे पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न चित्रपट करतो. अनमोल भावे यांचे ध्वनिसंयोजन आणि साधीसरळ वेशभूषा याचीही दखल घेतलीच पाहिजे.
मामाच्या गावाला जाऊया
निर्माता – पंकज छल्लाणी
लेखक-दिग्दर्शक – समीर हेमंत जोशी
छायालेखन – अभिजीत दि. अब्दे
संगीत – प्रशांत पिल्लई
संकलन – सुचित्रा साठे
ध्वनी – अनमोल भावे
वेशभूषा – पूर्ती कुलकर्णी
कलावंत – मृण्मयी देशपांडे, अभिजीत खांडकेकर, शुभंकर अत्रे, साहील मालगे, आर्या भरगुडे