गोव्यात इन्स्पेक्टरच्या हुद्दय़ावर गेलेल्या बाजीराव सिंघमने भ्रष्टाचाराविरोधात, अन्यायाविरोधात लढा देताना तिथला भ्रष्ट मंत्री जयकांत शिकरेचे शिरकाण केले होते. त्यामुळे आता ‘सिंघम रिटर्न’मध्ये बाजीराव सिंघमला बढती मिळाली आहे. तो थेट मुंबईत पोहोचला आहे, तेही पोलीस उपायुक्त म्हणून..रोहित शेट्टी दिग्दर्शित आगामी ‘सिंघम रिटर्न’मध्ये बाजीराव मुंबईचा पोलीस उपायुक्त म्हणून वावरताना दिसणार असून, या वेळी काळा पैसा कमावणाऱ्यांना लगाम घालण्याची जबाबदारी त्याच्यावर असणार आहे. ‘सिंघम’ हा अ‍ॅक्शनपट होता, मात्र या वेळी सिक्वलची कथा आधीपेक्षाही जास्त हाणामारी, नाटय़ असा सगळा मसाला घेऊन येणार आहे. काळा पैसा ही आपल्या देशातली सध्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे सिंघमला मुंबईत या समस्येविरोधात लढण्यासाठी आणण्यात आलं आहे, असं सेटवरच्या सूत्रांनी सांगितलं. या चित्रपटात करिना कपूर ‘सिंघम’ची नायिका असून तिनेही अजयच्या बरोबरीने स्टंट्स केले आहेत.  रोहित शेट्टी आणि अजय देवगण या जोडीच्या ‘सिंघम’ चित्रपटाने तिकीटबारीवर धुमाकूळ घातला होता. आता ‘सिंघम रिटर्न’मध्येही ही जोडी पुन्हा एकदा धमाका करेल, अशी इंडस्ट्रीला अपेक्षा आहे आणि त्याचसाठी रोहितने या वेळी सिंघमची कथा पहिल्यापेक्षा मोठय़ा कॅनव्हासवर आणि मोठी समस्या घेऊन चित्रित केली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. १५ ऑगस्टला ‘सिंघम रिटर्न’ सगळीकडे प्रदर्शित होणार आहे.