‘तनु वेड्स मनु’ हा चित्रपट विविध कारणांनी गाजला. आर. माधवन आणि कंगना राणावत अशी हटके पण, चिवित्र जोडी, पंजाबच्या गल्लीबोळांमधून फिरणारा सिनेमा, तिथली संस्कृती, लग्नांमधील हेवेदावे अशा वेगवेगळया गोष्टींमुळे हा चित्रपट इतका गाजला की दिग्दर्शक आनंद एल. राय हे नाव बॉलिवूडमध्ये प्रस्थापित झाले. या चित्रपटानंतर आलेल्या ‘रांझना’नेही दिग्दर्शक म्हणून आनंद राय यांना यश मिळवून दिले असले तरी पहिल्या चित्रपटाचे यश आणि त्याबद्दल वाटणारे प्रेम हे खासच असते. त्यामुळे ‘तनु वेड्स मनु’च्या सिक्वलबद्दल आनंद राय स्वत:च जास्त उत्सूक आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एखादा चांगला मराठी सणाचा मुहूर्त पकडावा, ही आनंद राय यांची इच्छा होती. मात्र, सध्या कुठलाही सण नाही हे लक्षात आल्यानंतर येत्या अक्षय तृतीय्येच्या मुहूर्तावरच या सिक्वलच्या प्रमोशनचा नारळ फोडायचा, असा निर्धार आनंद राय यांनी केला आहे.
‘तनु वेड्स मनु रिटर्न्‍स’ हा चित्रपटही पहिल्या चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. आधीच्या चित्रपटातील सगळी पात्रे अगदी कंगना, माधवन, जिम्मी शेरगिलसह सगळे कलाकार सिक्वलमध्ये दिसणार आहेत. तनु आणि मनुच्या लग्नावर हा सिनेमा संपला होता. लग्नानंतर या दोन टोकाचे स्वभाव असलेल्या तनु आणि मनुच्या आयुष्यात काय सुरू आहे, याचा वेध सिक्वलमध्ये घेण्यात आला आहे. कथेत आणखी एका पात्राची भर पडली आहे ती म्हणजे तनुच्या बहिणीची कुसूमची. कंगना राणावत सिक्वलमध्ये दुहेरी भूमिकेत आहे. कंगनाला नुकताच दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तिच्या ‘क्वीन’ची जादू अजूनही प्रेक्षकांच्या मनावरून उतरलेली नाही. आणि त्यात या चित्रपटात तिचा डबल रोल पहायला मिळणार असल्याने सिक्वलभोवती फारच कुतूहल निर्माण झाले आहे हे दिग्दर्शक आनंद राय यांच्याही लक्षात आले आहे.
म्हणूनच, ‘तनु वेड्स मनु रिटर्न्‍स’ची सुरूवातच दणक्यात प्रमोशनने करायची, असे त्यांच्या मनाने घेतले. स्वत: आनंद राय हे मराठी नाहीत पण, त्यांना मराठी संस्कृ ती मनापासून आवडते. मराठी सणांविषयी त्यांना खूप आत्मियता आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनची सुरूवात एखाद्या मराठी सणाच्या मुहूर्तावर व्हावी अशी त्यांची इच्छा होती. पण, आता लगेच असा कुठलाही मराठी सण नाही, अशी माहिती त्यांना मिळाली. मात्र, अक्षय तृत्तीयेचा मुहूर्त हा घराघरांमध्ये पवित्र मानला जातो. मराठी घरांमध्येही अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला फार महत्त्व आहे हे समजल्यानंतर त्यांनी या सिक्वलच्या प्रमोशनचा शुभारंभ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरच करायचा निर्धार केला आहे. चित्रपटाची कथा पंजाब आणि हरयाणात घडत असल्याने प्रमोशनची सुरूवात तिथूनच केली जाणार आहे. अभिनेता जिम्मी शेरगिलनेही प्रमोशनची सुरूवात पंजाबमधून करावी, अशी इच्छा व्यक्त के ली होती. त्यानुसार, पंजाबमधून या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरूवात होणार आहे.