हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये चरित्रात्मक चित्रपटांची संख्या वाढताना दिसते आहे. ऐतिहासिक घटना तसेच लोकोत्तर व्यक्तींची महत्ता चित्रपटाद्वारे मांडण्याचा प्रघात निर्माण होऊ पाहतोय. लोकोत्तर व्यक्तींची पुस्तकरूपी चरित्रे एका चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर मांडण्याचा उद्देशही यामागे काही वेळा दिसून येतो. 

डॉ. प्रकाश आमटे, मिल्खा सिंग, पानसिंग तोमर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य आणि कर्तृत्व त्यांच्यावरील चरित्रपटांद्वारे लोकांसमोर आले आहे आणि लोकांना हे चित्रपट आवडले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चरित्रपट संगीतकार सुधीर फडके यांनी खूप वर्षांपूर्वीच रूपेरी पडद्यावर आणला. आता स्वा. सावरकर यांचे विचार, त्यांचा राष्ट्रवादी दृष्टिकोन, त्यांची विचारसरणी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर आणण्याचा धाडसी प्रयत्न नवोदित निर्माते-लेखक-दिग्दर्शक यांनी केला आहे. ‘व्हॉट अबाऊट सावरकर’ असे औत्सुक्यपूर्ण इंग्रजीमिश्रित शब्दांचे शीर्षक असलेला हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटाच्या दिग्दर्शकद्वयांपैकी नितीन गावडे यांच्याशी गप्पा मारताना सावरकरप्रेमी प्रेक्षकांबरोबरच स्वा. सावरकर यांच्याविषयी फारसे माहीत नसलेले प्रेक्षक, त्याहीपलीकडे जाऊन स्वा. सावरकर यांच्याविषयी मनात अढी असलेले प्रेक्षकही ‘सिनेमा’ म्हणून हा चित्रपट पाहतील किंबहुना त्यांनी तो जरूर पाहावा अशा पद्धतीची रचना केल्याचे गावडे यांनी ठाम प्रतिपादन केले.
‘व्हॉट अबाऊट’ असे इंग्रजी शब्द वापरल्यामुळे वाटत असलेल्या कुतूहलाबद्दल विचारले असता चित्रपटाचे पटकथा-संवादलेखकही असलेले नितीन गावडे म्हणाले की, आजच्या घडीला दहावीची परीक्षा दिलेल्या किंवा त्यापुढे शिकत असलेल्या तरुण पिढीला जी भाषा जवळची वाटते आणि ज्याचा सर्रास वापर ही पिढी करते त्या भाषेतील दोन शब्द शीर्षकात वापरून त्या पिढीला चित्रपटाविषयी कुतूहल जागृत व्हावे हा हेतू होता म्हणूनच हे शीर्षक वापरले. प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्यासाठी हा प्रयत्न जाणीवपूर्वक केल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
चित्रपटाबद्दल अधिक सांगताना ते म्हणाले, चित्रपटाचे पटकथा-संवाद लेखन आपण केले असले तरी दिग्दर्शक म्हणून आपण आणि रूपेश कटारे यांनी एकत्रित काम केले आहे.
चित्रपटाची अनेक वैशिष्टय़े आहेत. अभिनेता आणि स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी म्हणून सगळ्यांना माहीत असलेले शरद पोंक्षे यांची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे.
आम्ही हा चित्रपट भरपूर वेळ घेऊन आधी कागदावर पूर्ण तयार केला. पटकथा-संवाद आणि गाणी यावर मनासारखे काम केल्यानंतरच चित्रीकरणाकडे वळलो, असे सांगून नितीन गावडे म्हणाले की, मराठी चित्रपट बऱ्याचदा कुठे कमी पडतो याचा नीट विचार केला आणि जाणवले की चित्रपटांचे चित्रीकरण आणि सेट्सचा वापर करताना होणारा अस्सलपणाचा अभाव हे आहे. म्हणूनच या चित्रपटात सर्व अस्सल चित्रीकरणस्थळी चित्रीकरण करण्यात आले आहे. मुंबईतील हुतात्मा चौक, अमृतसर येथील सुवर्णमंदिर, बाघा सीमेजवळील प्रदेश, जालियनवाला बाग, दिल्लीतील इंडिया गेट, लाल किल्ला, शहीद पार्क, राष्ट्रपती भवन अशा ठिकाणी जाऊन चित्रीकरण केले आहे. चित्रपटाचा कॅनव्हास सौंदर्यपूर्ण आणि अस्सल दिसावा हाच यामागचा हेतू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वा. सावरकर या चित्रपटात नाहीत; परंतु अखंड चित्रपटभर प्रत्येक प्रसंग, दृश्य, संवाद यातून सावरकर यांचे विचार लोकांना दिसतील अशा पद्धतीची रचना केली आहे.
चित्रपटाचा नायक अभिमान मराठे ही भूमिका पुणेस्थित अभिनेता श्रीकांत भिडे यांनी साकारली असून त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. अभिमान मराठेच्या आजोबांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत शरद पोंक्षे झळकणार असून अतुल तोडणकर, अविनाश नारकर, सारा श्रवण, विवेक लागू आदींच्या भूमिका आहेत.
पूर्वाचल म्हणजे ईशान्य भारतातील सात राज्यांमधील माणसे कामानिमित्त मुंबईसह पुणे तसेच देशभरात अन्यत्र येतात, वास्तव्य करतात, तसेच मुंबई-पुणे येथे मोठय़ा प्रमाणावर पूर्वाचलातील विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्य करतात. परंतु आजही आपले अनेक लोक त्यांना ‘परदेशी’ समजतात. म्हणूनच नायकाची नायिका मणीपुरी दाखविली असून तिलासुद्धा स्वा. सावरकर यांचे विचार पटले आहेत आणि त्याचा प्रचार-प्रसार आपल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करताना ती नायकाला साथ देते आहे, असे चित्रपटातून दाखविण्यात आले आहे, असेही गावडे यांनी आवर्जून नमूद केले. ए. के. एन. सॅबस्टियन यांनी छायालेखन केले असून अभिषेक शिंदे प्रथमच संगीतकार म्हणून रूपेरी पडद्यावर येणार आहेत. त्याचबरोबर एक गाणे अवधूत गुप्ते यांनी केले आहे, अशी माहितीही गावडे यांनी दिली.
सुनील नांदगावकर