‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान जे काम करतो ते एकदाच करतो आणि सगळ्यांची वाहवा मिळवून घेतो. त्याला एखादी गोष्ट दोनदा करायला फारशी आवडत नाही. पण यावेळी मात्र आमिरचा विचार बदललेला दिसतोय. आता तो त्याच्याच एका सिनेमाच्या सिक्वेलमध्ये काम करायला तयार झाला आहे.
‘३ इडियट्स’ या सिनेमाचा दुसरा भाग येणार आहे. ‘३ इडियट्स’ सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. ‘३ इडियट्सच्या’ दुसऱ्या भागाच्या संहितेवर काम केले जात आहे. पण संहिता पूर्ण व्हायच्या आधीच आमिर खानला सिनेमाच्या कथानकाबद्दल सांगण्यात आले होते. आमिरला सिनेमाचे कथानकही आवडले. एवढेच नाही तर ‘३ इडियट्स’च्या या सिक्वेलमध्ये काम करण्याची तयारीही दर्शवली आहे. या सिनेमाची संहिता पूर्ण होत नाही तोवर या सिनेमाबद्दल अधिक बोलायला हिरानी यांनी नकार दिला.
संजय दत्त याच्यावर बनवण्यात येणाऱ्या चरित्रपटानंतर राजू आणि रॅन्चोचीही जोडी पुन्हा एकत्र येणार आहेत. आमिर खानने आपल्या २८ वर्षांच्या कारकिर्दीत कोणत्याही सिनेमाच्या सिक्वेलमध्ये काम केलेले नाही. २०१३ मध्ये आलेली ‘धूम-३’ मध्ये आमिर असला तरी या आधीच्या धूम सिनेमांत तो नव्हता.
आमिर खानचा ‘दंगल’ सिनेमा २३ डिसेंबर २०१६ ला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातही तो तीन मुलींच्या वडीलांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय संजय दत्तच्या जीवनावर आधारित एक सिनेमा बनणार, यात संजय दत्तच्या वडिलांची म्हणजे सुनिल दत्त यांची भूमिका आमिर खान करणार असल्याची चर्चा आहे. तर संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर करणार आहे. आता बॉलिवूडच्या हा सुपरस्टार दुसऱ्या सुपरस्टारच्या म्हणजे रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका करायला तयार होतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.