संजय दत्तच्या जीवनावर आधारित एक सिनेमा बनणार असल्याची बातमी जुनी होते न होते तोच आता त्या सिनेमाशी निगडीत एक नवीन बातमी आली आहे. यात संजय दत्तच्या वडिलांची म्हणजे सुनिल दत्त यांची भूमिका आमिर खान करणार असल्याची चर्चा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सिनेमाचे दिग्दर्शन राजू हिरानी करणार आहे. सुनील दत्त यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी आमिर खान याच्याशी बोलणी झाली आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीनुसार राजू हिरानी आमिर खानला ही व्यक्तिरेखेला वठवण्यासाठी आमिरची समजूत काढत आहे. जर आमिर खानने या व्यक्तिरेखेसाठी होकार दिला तर हिंदी सिनेमाच्या इतिहासात ही सगळ्यात वेगळी कास्टिंग असेल.
सुत्रांच्या माहितीनुसार, आमिर खान संजय दत्तचा खूप जवळचा मित्र आहे. शिवाय आमिरला सिनेमाची पटकथाही आवडली आहे. त्यामुळे ७० एमएमच्या पडद्यावर आमिरला वरिष्ठ व्यक्तिरेखेमध्ये बघायला त्याचे चाहते नक्कीच उत्सुक असतील. सध्या आमिर डिसेंबरमध्ये येणारा त्याचा सिनेमा ‘दंगल’च्या तयारीत व्यस्त आहे.
आमिर खानचा ‘दंगल’ सिनेमा २३ डिसेंबर २०१६ ला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातही तो तीन मुलींच्या वडीलांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता बॉलिवूडच्या हा सुपरस्टार दुसऱ्या सुपरस्टारच्या म्हणजे रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका करायला तयार होतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
‘दंगल’ या सिनेमाचे दिग्दर्शन नितेश तिवारीने केले आहे. या सिनेमात आमिर कुस्तीपटू महावीर फोगट यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. महावीर फोगट आपल्या मुलींना कुस्ती शिकवतात. अमिताभ भट्टाचार्या यांनी लिहिलेल्या या सिनेमात साक्षी तन्वर आमिर खान याची पत्नीच्या भूमिकेत दिसेल. साक्षी तन्वर हे टेलिव्हिजन क्षेत्रातलं एक नावाजलेलं नाव आहे.