‘सोनी’ वाहिनीवर प्रदर्शित केली जाणारी ‘पहरेदार पिया की’ ही मालिका काही दिवसांपूर्वीच बंद करण्यात आली. मालिकेच्या कथानकाला होणारा विरोध पाहता इच्छा नसतानाही कलाकार आणि निर्मात्यांना शरणागती पत्करावी लागली होती. पण, ‘इंडियन एक्सप्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या मालिकेचा नवा सीझन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किंबहुना त्यासाठीची तयारीही शेवटच्या टप्प्यात आली आहे.

सध्यातरी या मालिकेला ‘पहरेदार पिया की २’ असं संबोधण्यात येत असून, अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हीच यात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तिच्यासोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी रोहित सुचांती या टेलिव्हिजन अभिनेत्याचं नाव पुढे करण्यात आलं आहे. पण, रोहितने मात्र याबद्दल फारशी माहिती न देता मौन पाळलं आहे. या भूमिकेसाठी आपली ऑडिशन घेण्यात आली असून, सध्यातरी माझ्यापर्यंत कोणत्याच प्रकारची अधिकृत माहिती पोहोचली नाहीये, असं त्याने स्पष्ट केलं.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

काही दिवसांपूर्वी या भूमिकेसाठी ‘डी३’ फेम शांतनू महेश्वरीचं नाव पुढे करण्यात येत होतं. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता या मालिकेशी रोहित सुचांतीचं नाव जोडलं गेलं आहे. ‘एमटीव्ही वॉरियर हाय’ या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करणारा रोहित तरुण प्रेक्षक वर्गामध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील भूमिकेमुळेही तो बराच चर्चेत आला होता. त्यामुळे आता ‘पहरेदार….’च्या या मालिकेला साजेसा रोहित ही भूमिका कशा प्रकारे निभावतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच या मालिकेतील त्याच्या आणि तेजस्वीच्या केमिस्ट्रीवरही प्रेक्षकांची नजर असणार आहे.

‘पहरेदार पिया की’ या मालिकेच्या नव्या पर्वासाठी कथानकामध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये त्या बदलांनुसार मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे. परदेशातील विद्यापीठातून शिक्षण घेऊन आलेल्या ‘रतन’च्या आयुष्यात पुढे कोणत्या गोष्टी घडतात यावर मालिकेतून भाष्य करण्यात येणार आहे. मालिकेच्या कथानकात बऱ्याच वर्षांचा काळ लोटल्याचं दाखवण्यात येणार असून, तेजस्वी ३० वर्षीय महिलेच्या भूमिकेत दिसेल. त्यामुळे वयातील अंतर, त्याचा वैवाहिक जीवनावर होणारा परिणाम, इतक्या वर्षांनंतर बदललेलं वातावरण अशा एकंदर परिस्थितीचा आधार घेत मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.