‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन सुरु झालेला वाद आता शमला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई फळाला आली असून हा चित्रपट आता पूर्वनियोजित वेळेनुसार म्हणजेच २८ ऑक्टोबरलाच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविरोधात मनसेने तलवार म्यान केल्याचे दिसत असले तरी अद्याप यासंदर्भात मनसेकडून अधिकृतपणे भूमिका मांडण्यात आलेली नाही.

ऐ दिल है मुश्कीलच्या वादासंदर्भात शनिवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, चित्रपटाचा दिग्दर्शकर करण जोहर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.   राज ठाकरे यांच्यासह शालिनी ठाकरे, अमेय खोपकर, नितीन सरदेसाई आदी नेतेमंडळी उपस्थित होती. तर करण जोहरसोबत निर्माता असोसिएशनचे सदस्य मुकेश भट, सिद्धार्थ रॉय कपूर आदी मंडळी उपस्थित होती. सुमारे पाऊण तास ही बैठक चालली. या बैठकीनंतर मुकेश भट यांनी पत्रकारांना चित्रपट दिवाळीतच प्रदर्शित होणार असे सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई फळाला आली असे दिसते. मनसेने मात्र याबाबत अद्याप कोणतीही भूमिका मांडलेली नाही.

उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करु देणार नाही अशी भूमिका मनसेने मांडली होती.  दिवाळीत प्रदर्शित होणा-या ऐ दिल है मुश्किल या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान असल्याने या चित्रपटाला मनसेने विरोध दर्शवला होता. चित्रपट प्रदर्शित कराल तर फटाके फुटतील असा सूचक इशाराच मनसेने मल्टीप्लेक्स चालकांना दिला होता.  यापुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही असे करण जोहरने जाहीर केले होते. पण या चित्रपटासाठी सुमारे ३०० जणांनी मेहनत घेतल्याने चित्रपटाचे प्रदर्शन होऊ द्यावे अशी विनंतीही त्याने केली होती. पण करण जोहरच्या विनंतीनंतरही मनसेचा विरोध कायम होता. शेवटी करण जोहरने थेट केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.  सिनेमातील उत्पन्नांचा काही भाग उरी हल्ल्यातील शहीदांना देऊ असे आश्वासनही करण जोहरने या बैठकीत दिले होते.  ऐन दिवाळीत पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण असतो. त्यात ऐ दिल है मुश्किलचा वाद थांबला नाही तर पोलिसांवरील ताण आणखी वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे शेवटी मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेत मनसे आणि करण जोहरमध्ये चर्चा घडवून आणली.