‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमात अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या व्यक्तिरेखांबद्दलची माहिती लीक झाली आहे. हे काम दुसऱ्या कोणाकडून नाही तर खुद्द या सिनेमाचा दिग्दर्शक करण जोहरकडूनच ही माहिती लीक झाली आहे. नुकताच एका मुलाखतीत करण बोलला की ऐश्वर्याने याआधी अशी व्यक्तीरेखा कधीच केली नाही. याबद्दल अधिक बोलताना तो पटकन बोलून गेला की, या सिनेमात ऐश्वर्या एका कवियित्रीची भूमिका करत आहे. तर अनुष्का शर्मा संघर्षमय कुटुंबातून आलेल्या मुलीची भूमिका साकारत आहे. दोन्ही अभिनेत्रींनी या सिनेमात सशक्त महिलांची भूमिका निभावली आहे.
रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय बच्चन आणि फवाद खान यांचा सहभाग असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला. हा टिझर प्रदर्शित झाल्यावर लेगच सोशल मीडियावर व्हायरलही झाली. अनेकांना हा टिझर पसंतही पडला. या टिझरमध्ये ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा, रणबीर कपूर, फवाद खान दिसत आहेत. पण ते कोणत्या भूमिकेत असतील त्याबद्दल गुप्तता पाळण्यात आली आहे. या टिझरला ट्वीट करताना करण जोहरने लिहिले होते की, ही एक एकतर्फी प्रेम, घनिष्ठ मैत्री आणि प्रेमभंग यांची कथा आहे. दिवाळीमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
याच दिवशी अजय देवगण याचा ‘शिवाय’ही प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या दिवाळीला मनोरंजनाची पूर्ण मेजवानी प्रेक्षकांना मिळेल यात काही शंका नाही