‘धर्मा प्रॉडक्शन’, करण जोहर म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर ‘कुछ कुछ होता है’, ‘माय नेम इज खान’ आणि ‘स्टुडंट ऑफ द इयर’ यांसारखे अनेक चित्रपट उभे राहतात. याच चित्रपटांच्या यादीत लवकरच एका नव्या चित्रपटाची भर पडणार आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. टिझरबाबतची उत्सुकता करणने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुनही व्यक्त केली. एका गाण्याचा रुपात असणाऱ्या या टिझरमध्ये अभिनेता रणबीर कपूर एक गाणे गाताना दिसत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय बच्चन आणि फवाद खान यांची झलकही टिझरमध्ये पाहायला मिळत आहे.
‘तु सफर मेरा…’ असे म्हणत एका गाण्याने या टिझरची सुरुवात होते. ‘बर्फी’, ‘ढिशूम’, ‘बजरंगी भाईजान’ यांसारख्या चित्रपटांना संगीत देणाऱ्या संगीतकार प्रितम चक्रवर्ती म्हणजेच ‘प्रितम’ने या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. ‘रोमॅन्टिक ड्रामा’  प्रकारात येणाऱ्या या चित्रपटाच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा करण जोहर सांभाळत आहे.’ए दिल है मुश्किलच्या टिझरआधी या चित्रपटाचे एक पोस्टरही लाँच करण्यात आले होते. पोस्टर प्रसिद्ध झाल्यानंतर काही धणांतच सोशल मीडियावर या चित्रपटाबाबतची चर्चा सुरु असतानाच आता ‘ए दिल है मुश्किल’चा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. एकतर्फी प्रेम, घनिष्ठ मैत्री आणि त्यातून होणारा हिरमोड असे हटके कथानक हाताळत हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे. रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा आणि अभिनेता फवाद खान अशी तगडी स्टारकास्ट ‘ए दिल है मुश्किल’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीची रंगत वाढवण्यात करणचा ‘ए दिल है मुश्किल’ किती यशस्वी ठरतो हे येणाऱ्या काळातच ठरेल.