‘बेगम जान’ चित्रपटात हरहुन्नरी अभिनेत्री विद्या बालनसोबतच सहकलाकारांनी देखील लक्षवेधी काम केले. या चित्रपटात रुबिना नावाची भूमिका साकारणाऱ्या गौहर खानने नुकतेच एका मुलाखतीमध्ये चित्रपटातील भूमिकेबद्दल भावना व्यक्त केल्या. श्रीजीत मुखर्जी यांच्या चित्रपटानंतर मला परिपूर्ण अभिनेत्री असल्याचे वाटत असून मी कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देऊ शकते, असा आत्मविश्वास तिने व्यक्त केला. या चित्रपटात संधी दिल्यानंतर श्रीजीत मुखर्जीला कधीच विसरु शकत नाही, असे सांगत तिने बेगम जानच्या दिग्दर्शकाचे आभार मानले. यावेळी ती विद्या बालनला देखील विसरली नाही. विद्या बालनमुळे माझी स्वप्नपूर्ती होऊ शकली. ती माझ्या नजरेत नेहमीच सुपरस्टार राहिल, असेही गौहर यावेळी म्हणाली. चित्रपटाचे विविध स्तरावर झालेल्या कौतुकासंदर्भात गोहर म्हणाली की, ‘बेगम जान’ चित्रपटानंतर आयुष्य सुंदर झाले आहे. मी ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी चित्रपटातील भूमिकेबद्दल माझे कौतुक झाले.

यापूर्वी गौहरने या चित्रपटातील कामाचा अनुभव शेअर केला होता. गौहर खानने आतापर्यंत ‘इश्कजादे’, ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटासह अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. तसेच ती  बिग बॉसमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. मात्र,  ‘बेगम जान’  चित्रपटातील भूमिकेने तिला आता वेगळी ओळख मिळाली आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत या चित्रपटातील भूमिकेसाठी तिचे सर्वाधिक  कौतुक झाले आहे. याच चित्रपटातील  बोल्डसीनमुळे तिच्यावर टीका देखील झाली होती.