अमुक एका कलाकार जोडप्याच्या नात्यात आला दुरावा… अशा आशयाच्या चर्चांना आणि घटनांना सध्या उधाण आले आहे. असे असतानाच अभिनेता अजय देवगण आणि काजोलच्या नात्यात ‘भिंत’ आल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या. अनेक वर्षे सुखी वैवाहिक आयुष्य एकमोकांसोबत काढल्यानंतर अचानकच यांच्या नात्यात असे काय झाले? हा प्रश्न जवळपास अनेकांनाच पडला होता. पण अजय आणि काजोलच्या नात्यात ‘तसा’ दुरावा आणि कोणा तिसऱ्याचे आगमन झालेले नाही. अजयने केलेल्या एका ट्विटमुळे ही बाब अनोकांच्या लक्षात आली, आणि त्यवरुनच अनेक चर्चा रंगल्या.

बास्केटबॉलपटू सतनाम सिंग याच्यासोबत काढलेला एक फोटो अजय देवगणने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोसोबत अजयने ‘काजोल आणि माझ्यामध्ये अचानक भिंत आल्यासारखे वाटत आहे’ असे ट्विट केले होते. सतनामची उंची पाहता अजय आणि काजोलमध्ये खरंच भिंत उभी आहे असे वाटत आहे.

अजय आणि काजोल सध्या ‘शिवाय’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या मार्केटिंग आणि प्रसिद्धीची जबाबदारी काजोल सांभाळत आहे. ‘शिवाय’ या चित्रपटामध्ये अजय अभिनयासोबतच निर्मिती आणि दिग्दर्शनाची तिहेरी मदार सांभाळत आहे. साएशा सैगल ही नवखी अभिनेत्री या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘शिवाय’ चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटामधील ‘दरखास्त’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून ते बरेच गाजत आहे. हे गाणे गाजण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यातील चुंबनदृश्य. वेगळ्या धाटणीच्या कथानकाला हाताळणारा ‘शिवाय’ हा चित्रपट २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. २८ ऑक्टोबरला रणबीर कपूरचा ‘ए दिल है मुश्किल’ आणि अजय देवगणचा ‘शिवाय’ हे दोन्ही तगडे चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे कोणता चित्रपट बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे राहिल.