बी टाऊनमध्ये पदार्पणानंतर अनेक कलाकार कालांतराने त्यांच्या कुटुंबापासून वेगळे होत स्वत:च्या घरात राहायला जाताना दिसतात. रणबीर कपूर, कंगना रणौत अशा कलाकारांच्या यादीमध्ये आता आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली आभिनेत्री आलिया भट्ट तिच्या नव्या घरात लवकरच राहायला जाणार आहे. येत्या दोन आठवड्यांमध्ये आलिया तिची बहिण शाहीनसोबत नव्या घरात शिफ्ट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आलियाचे नवे घर कसे असेल याबाबत अनेकांनाच कुतुहल होते. त्यामुळे आलियाच्या घराबाबत अनेकांना पडलेल्या प्रश्नांची थोडीफार उत्तरे आलियाच्या इन्टेरिअर डिझायनरने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीतून दिली आहे.
रिचा बहल यांनी आलियाच्या घराचे इन्टेरिअर डिझायनिंग केले आहे. याआधी रिचाने ‘क्वीन’ कंगनाच्या घराचे इन्टेरिअर डिझायनिंग केले होते. अलियाच्या घराबाबत सांगताना, ‘त्या घरात आलिया शाहीनसोबत राहायला जाणार असल्यामुळे त्यांच्या घराला मी एक ‘यंग लूक’ दिला आहे. त्या घराला काहीसा युरोपियन टचही देण्यात आला आहे. आलियाला कोणत्याही बाबतीत भडकपणा फारसा आवडत नाही, त्यामुळे तिच्या घरात सफेद रंगाचा जास्त वापर करण्यात आला आहे’ असे रिचा म्हणाली.
वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या आलियाच्या या घरात तिने त्या-त्या ठिकाणाहून आणलेल्या विविध शोभेच्या वस्तूही ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आलियाचे घर सर्वांगाने परिपूर्ण आहे असेच दिसत आहे. विविध चित्रपटांतून महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसलेल्या आलिया भट्टने ‘उडता पंजाब’ या चित्रपटातील भूमिकेसाठी अनेकांची प्रशंसा मिळवली होती. सध्या आलिया तिच्या आगामी ‘डियर जिंदगी’ या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये ती अभिनेता शाहरुख खानसोबत झळकेल.