७५ व्या वाढदिवसानंतर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना आनंद साजरा करण्यासाठी आणखी एक कारण मिळाले आहे. बिग बींसोबतच सोनी वाहिनीसाठीही हा आठवडा जल्लोषाचा ठरला. ‘कौन बनेगा करोडपती ९’ हा शो टीआरपीच्या यादीत अग्रस्थानी पोहोचला आहे. बिग बी सूत्रसंचालन करत असलेल्या या शोने सलमान खानच्या ‘बिग बॉस’ आणि अक्षय कुमारच्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’लाही मागे टाकले आहे. केबीसीला या सिझनमध्ये जेव्हा पहिली कोट्यधीश अनामिका मजुमदार मिळाली, त्या आठवड्यातही शोच्या टीआरपीने उच्चांक गाठलेला. त्यामुळे ज्ञानाच्या आधारावर पैसे जिंकण्याची संधी देणारा हा शो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय असेच म्हणावे लागेल.

केबीसीच्या यंदाच्या सिझनमध्ये काही नाविन्यपूर्ण बदल करण्यात आले. याचाही फायदा शोला चांगलाच झाला. सर्वसामान्य स्पर्धकांसोबत दर आठवड्याला रिअल लाइफ हिरो शोमध्ये सहभागी व्हायचे. आतापर्यंत भारतीय महिला क्रिकेट संघाचे खेळाडू हरमनप्रीत कौर, मिताली राज आणि स्मृती मंधाना यांनी हजेरी लावली होती. त्यासोबतच पी.व्ही.सिंधू, ‘सुपर ३०’चे संस्थापक आनंद कुमार यांनासुद्धा शोमध्ये निमंत्रित करण्यात आले होते.

Padmavati: जाणून घ्या दीपिका, शाहिद, रणवीरचे मानधन

सलमानच्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचा अकरावा सिझन नुकताच सुरू झाला आहे. प्रीमिअरच्या दिवशी या शोचा टीआरपी वाढलेला पाहायला मिळाला, मात्र केबीसीला तो टक्कर देऊ शकला नाही. अक्षय कुमारच्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ हा कॉमेडी शो प्रेक्षकांना फारसा भावला नाही. बिग बींच्या ‘केबीसी ९’ने बहुचर्चित मालिकांनाही मागे टाकले आहे. नामकरण, कुमकुम भाग्य, शनी या मालिकांचा टीआरपी घसरला आहे.