प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू आणि नवोदित अभिनेता अनुपसिंग ठाकूर हा नेहमीच त्याच्या वेगळेपणामुळे चर्चेत असतात. अनुपसिंगने शरिरसौष्ठव स्पर्धेत भारताचे नाव उंचावले होते. त्याच्या या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे लोणावळा येथील वॅक्स म्युझियममध्ये त्याचा प्रतिकात्मक पुतळा ठेवण्यात येणार आहे . सेलिब्रिटीज वॅक्स म्युझियमच्या सुनील कंडलूर यांनी हा पुतळा तयार केला आहे.

गोरेगाव येथील वेस्टीन हॉटेलमध्ये अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. अनुपसिंग हा पहिलाच शरीरसौष्ठवपटू आहे ज्याचा प्रतिकात्मक पुतळा लोणावळा येथील वॅक्स म्युझियममध्ये ठेवला जाणार आहे. याआधी क्रिकेटपटू कपिल देव यांचा पुतळा या म्युझियममध्ये ठेवला गेला आहे. या पुतळ्याच्या अनावरणावेळी एजाज खान, मृण्मयी देशपांडे, लीना मोगरे हे कलाकारही उपस्थित होते.

‘मिस्टर वर्ल्ड २०१५’ मुळे ओळखले जाणारा अनुप आता अभिनय क्षेत्रातही पदार्पण करत आहे. तो एकाच वेळी पाच भाषांमध्ये येणाऱ्या चित्रपटात पदार्पण करत आहेत. सध्या तो या चित्रपटासाठी तेलगू, कन्नड, तामिळ, मराठी आणि हिंदी अशा पाच भाषांमधे एकाच वेळी काम करत आहेत.

चित्रपटात काम करत असतानाच अनुप याने ७ व्या जागतिक शरिरसौष्ठव चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावले. याचबरोबर ४९ व्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक आणि फिट फॅक्टरमध्ये रौप्य पदक पटकावले होते. त्यामुळे आजच्या तरुणाईसाठी अनुपसिंग हे चांगलेच उदाहरण ठरु शकते.