क्रिकेटपटू युवराज सिंग आणि त्याची प्रेयसी अभिनेत्री, मॉडेल हेजल किच काही दिवसांपूर्वीच चंदिगढ येथे विवाहबद्ध झाले. गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेले हे जोडपे त्यानंतर गोव्याला पोहोचले. येथे हिंदू धार्मिक परंपरांअंतर्गत या दोघांचेही काल पुन्हा लग्न झाले. त्यानंतर आता दिल्लीला त्यांच्या लग्नाचे दणक्यात रिसेप्शन होणार आहे.

युवराज आणि हेजल हे अभिनेत्री-क्रिकेटर जोडपे त्यांच्या लग्नामुळे चर्चेत तर आहेच. पण त्याचसोबत आणखी अभिनेत्री-क्रिकेटर जोडी यादरम्यान चर्चेत आली आहे. अर्थातच, ती म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली. युवी-हेजलच्या गोव्यात झालेल्या लग्नाला विराटने अनुष्कासह उपस्थिती लावली होती. हे प्रेमीयुगुल गोव्याला एकाच विमानाने पोहचले होते. तेव्हाही सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे खिळल्या होत्या. सध्या, या दोघांचा नव दाम्पत्यासोबतचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ही दोन्ही जोडपी फोटोत सुंदर दिसत आहेत यात तिळमात्र शंका नाही. गोव्यात लग्न झाल्यानंतर दिल्लीत युवी-हेजलने रिसेप्शन ठेवले आहे. त्यावेळीही विराट-अनुष्का एकत्र हजेरी लावतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

viraat-kohli

दरम्यान, जवळपास आठवडाभरासाठी आयोजित करण्यात आलेल्या या विवाहसोहळ्याच्या गडबडीदरम्यानच युवीच्या पत्नीचे, म्हणजेच अभिनेत्री हेजल किचचे नाव बदलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चंदिगढपासून ४० ते ५० कि.मी. अंतरावर असलेल्या डेरा बाबा राम सिंग येथे लग्नविधी सुरु असताना हेजलचा उल्लेख ‘गुरबसंत कौर’ असा करण्यात आला. या गुरुद्वाऱ्यामध्ये ज्यावेळी बलविंदर सिंग विवाहाच्या सर्व विधी हाताळत होते त्याचवेळी त्यांनी हेजलचा उल्लेख ‘गुरबसंत कौर’ या नावाने केला आणि त्याचवेळी तिच्या बदललेल्या नावाबद्दल सर्वांच्या ध्यानात आले. युवराज सिंग आणि त्याची आई शबनम सिंग बाबा राम सिंग यांचे भक्त आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनीच हेजलचे नवे नाव सुचवले आहे.

युवराजच्या लग्नानंतर वैवाहिक आयुष्यासाठी भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्या दरम्यान, भारतीय संघात युवराजचा सहकारी राहिलेला सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याने युवीला एक सल्ला देऊ केला आहे. पण हा सल्ला क्रिकेटशी संबंधित नसून वैवाहिक जीवनाशी निगडीत आहे. एक विवाहित पुरूष म्हणून गंभीरने नुकतेच विवाहबद्ध झालेल्या युवीला वैवाहिक जीवनात उपयोगी पडेल असा सल्ला क्रिकेटींग अंदाजात दिला. गौतम गंभीरला युवराजच्या संगीत कार्यक्रमात उपस्थित राहता आले नसले, तरी त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून युवीला शुभेच्छा दिल्या. गंभीरने आपल्या ट्विटर हॅण्डलवर युवराज आणि हेजलचा संगीत कार्यक्रमातील फोटो ट्विट केला आहे. गौतम ट्विटरवर म्हणाला की, ‘युवीने आपल्या शेरवानीच्या आत ‘चेस्टगार्ड’ लावलंय असं वाटतंय, पण मित्रा वैवाहिक जीवनात पडणाऱया बाऊन्सरपासून बचावासाठी अद्याप कोणताही चेस्टगार्ड तयार करण्यात आलेला नाही.’