माणसं आपण भ्रष्टाचारी आहोत हे आधी कबूलच करीत नाहीत. अगदीच जर कुणी तोंडावर भ्रष्टाचाराचे पुरावे फेकले तर ‘आपल्या विरोधकांनी रचलेलं हे कुभांड आहे, आणि आपल्याला यात अकारण गोवलं गेलं आहे,’ असं ते बिनदिक्कतपणे सांगतात. काही वेळा मात्र आपल्या कृत्याचं निर्लज्ज समर्थन करायलादेखील ती मागेपुढे पाहत नाहीत. आणि तरीही आपण कसे साव आहोत हा वर आवही आणतात. अशी माणसं आपल्याला प्रत्यही भेटत असतात.. आजूबाजूला दिसत असतात. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, हे सर्वज्ञात असूनही कायद्याच्या कचाटय़ात मात्र कुणी त्यांना अडकवू शकत नाही, वा त्यांचं कुणी काही वाकडंही करू शकत नाही. कारण वपर्यंत त्यांचे हात पोचलेले असतात. करूनसवरून ते नामानिराळे राहतात. यातली अग्रणी जमात म्हणजे राजकारणी! अर्थात् हल्ली हे सर्वच क्षेत्रांत पाहायला मिळतं. या सामाजिक ऱ्हासाचं प्रतिबिंब आधुनिक मराठी रंगभूमीच्या आरशात न उमटतं तरच नवल!

एका आर्किटेक्ट कंपनीतले सगळेजण या ना त्या गैरप्रकारात अडकलेले असूनही आपण (तेवढे) कसे त्यातले नाही, हे परोपरीनं दर्शवण्याचा कसा प्रयत्न करतात आणि त्यात कसे उघडे पडत जातात, याचं विलक्षण भेदक चित्रण ‘स्पिरिट’ या नव्या नाटकात लेखक-दिग्दर्शक विजय निकम यांनी केलं आहे. रंगमंचावर प्रत्यक्षात एकही घटना न घडतासुद्धा बरंच काही घडतं. सदेह न अवतरताही एक पात्र या साऱ्यात कळीची भूमिका निभावतं. आणि त्यातून सर्वाचेच मुखवटे टराटरा फाटत जातात..

कंपनीचे मालक भातणकर यांनी कर्मचाऱ्यांसाठी एका तारांकित हॉटेलात एक पार्टी आयोजित केलेली असते. या पार्टीला झाडून सारे हजर असतात. अगदी शिपायासह! ही पार्टी कशासाठी आहे, हे भातणकर सुरुवातीलाच सांगून टाकतात. कंपनीची वार्षिक उलाढाल आणि कंपनीत नुकत्याच घडलेल्या एका कटु घटनेचा ऊहापोह आणि त्यासंबंधी कंपनीचे एक वरिष्ठ अधिकारी मराठे यांनी तयार केलेला अहवाल सर्वासमोर सादर करण्यासाठी ही पार्टी असते. काळे, वाघ, सोहनी, पेठे, राधा, शिपाई सदा असे झाडून सारे पार्टीला आलेले असतात. कंपनीत नवीन आर्किटेक्ट म्हणून दाखल होत असलेली भातणकरांची पुतणी श्रद्धा हिलाही पार्टीचं निमंत्रण असतं. भातणकरही सपत्निक पार्टीत हजर असतात. फक्त मराठेच तेवढे यायचे बाकी असतात. त्यांची वाट पाहणं सुरू असतानाच हळूहळू पार्टी वेग घेते. पार्टीत सर्वाना मनमोकळेपणी वागा-बोलायची मुभा असते. साहजिकच सगळे रिलॅक्स्ड मूडमध्ये असतात. मात्र, भातणकरांनी पार्टीचा अजेंडा जाहीर केल्यावर काहीसं तणावाचं वातावरण निर्माण होतं. जो-तो एकमेकांकडे संशयानं पाहू लागतो. वरकरणी जरी प्रत्येकजण पार्टी एन्जॉय करीत असला तरी संशयाचं मळभ मात्र कायम असतं. मराठेंच्या अहवालात काय असेल, याचं दडपण प्रत्येकाच्या मनावर असतं. त्यातून मग परस्परांवर आरोप-प्रत्यारोप, हेत्वारोप सुरू होतात. एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढल्या जातात. भातणकर शांतपणे हे पाहत राहतात. त्यांच्याही कार्यशैलीवर आक्षेप घेतले जातात. आरोप होतात. पण त्यांना थेट उत्तर देण्याऐवजी भातणकर राजकारणी गोलमाल उत्तरं देतात. किंवा मग ठरवून त्याकडे दुर्लक्ष करतात.

भातणकरांचे घटस्फोटित राधाशी संबंध आहेत. ती त्यांना कह्य़ात ठेवून आहे. पुरुषांच्या कमजोरीचा फायदा घेऊन आपला स्वार्थ कसा साधायचा, यात राधा निष्णात आहे. प्रत्येकाला खेळवत, वापरत तिनं कंपनीत आपलं बस्तान बसवलं आहे. भातणकरांबरोबरचे राधाचे संबंध त्यांच्या पत्नीला माहीत आहेत. परंतु पार्टीतही राधा त्यांच्यावर अधिकार गाजवू बघते तेव्हा बेचैन होऊन ती भर पार्टीत तमाशा करते. भातणकरही चिरडीला येऊन बायकोला वाट्टेल ते बोलतात आणि पार्टीतून शब्दश: हाकलून देतात. पार्टीतल्या उपस्थितांना यात काही खटकत नाही. कारण आपणही यापेक्षा वेगळे नाही आहोत याची प्रत्येकास जाणीव आहे. त्यामुळे काही घडलंच नाही अशा रीतीनं पार्टी त्यानंतरही विनाव्यत्यय सुरू राहते.

अशात काळेंची मराठेंसोबत ‘कट प्रॅक्टिस’ असल्याचा आरोप वाघ करतो. प्रथम हा आरोप साफ नाकारणारे काळे प्रकरण अंगाशी येणार असं दिसताच त्याची कबुली देऊन टाकतात. वर आपल्या पैसे खाण्याचं समर्थनही करतात. ‘मी नाही तर दुसऱ्या कुणीतरी हे केलंच असतं. मग मीच का करू नये?’ असा त्यांचा सवाल असतो. सोहनी एकीकडे वरिष्ठांचं लांगुलचालन करत कामगारांच्या पगारात हात मारत असतो. वाघने पार्टीत याची वाच्यता करताच तो हवालदिल होतो आणि रडून सर्वाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो. कंपनीत सर्वात ज्येष्ठ असलेल्या पेठेंनी आजवर भावुकतेच्या कोशात मश्गुल राहून या साऱ्याकडे काणाडोळा केलेला असतो. त्यांचंही माप वाघ त्यांच्या पदरी घालतो. सुरुवातीला आकांडतांडव करत का होईना, अखेरीस ते आपला दोष मान्य करतात. आपलं शरीर वापरून ‘काम’ करवून घेण्याच्या राधाच्या पद्धतीवरही वाघ हल्ला चढवतात. तेव्हा ती ‘त्या’ अस्त्राचा वापर वाघवरही करायचा प्रयत्न करते.

थोडक्यात, येनकेनप्रकारेण सगळेच जण कंपनीला खड्डय़ात घालण्याचं काम करीत असतात. भातणकरांना हे माहीत नसतं अशातला भाग नाही. तेही स्वत: धुतल्या तांदळासारखे नसल्याने आपली सोय बघून ते या प्रत्येकाचा वापर करत असतात. परंतु कंपनीत नव्यानं लागलेल्या ‘त्या’ तरुण मुलानं त्यांचे हे अपराध त्यांच्या तोंडावर स्पष्टपणे फेकल्यावर त्यांचा अहम् दुखावतो. ते त्याला कंपनीतून हाकलून देतात. आणि झाल्या प्रकाराचा चौकशी अहवाल तयार करायला मराठेंना सांगतात. तोच अहवाल घेऊन ते येणार असतात.

पण.. ते येत नाहीत. भलतंच काहीतरी घडतं. आणि..

लेखक-दिग्दर्शक विजय निकम यांनी आजच्या सडलेल्या व्यवस्थेचा आणि किडलेल्या माणसांचा कार्डिओग्रामच जणू ‘स्पिरिट’द्वारे काढला आहे. सगळं करूनसवरून वर सभ्यतेचा, स्वच्छ असल्याचा मानभावी मुखवटा धारण करणाऱ्या माणसांचा दंभस्फोट करणारं हे नाटक आहे. वर्तमान वास्तव एवढय़ा उघडय़ावाघडय़ा, हिंस्र पद्धतीनं मांडलेलं क्वचितच आढळतं. माणसांचे विविध ‘नमुने’ विजय निकम यांनी यात लीलया हाताळले आहेत. त्यांच्या दांभिकपणाची, भ्रष्टतेची विभिन्न रूपं त्यांनी भेदकपणे यात दाखविली आहे. त्यांना उघडेनागडे करताना ते कसलीच दयामाया दाखवीत नाहीत. मग तो कुणीही का असेना. प्रत्येक पात्राच्या अंतरंगात शिरून ते त्याचं असली रूप प्रेक्षकांसमोर उलगडतात. मग ती भातणकरांची पत्नी असो वा बदफैली वृत्तीची राधा! ते त्यांना परस्परांसमोर उभं करून विवस्त्र करतात. हे करत असताना ‘माणूस’ म्हणून कोण सच्चा आणि कोण कमअस्सल, हे त्यांच्या मनाशी पक्कं आहे. माणसांतील विकृती मांडण्यासाठी त्यांनी उपहास, उपरोध, विसंगती, वक्रोक्ती आदीचा यथेच्छ वापर केला आहे. तसंही दुसऱ्याला नग्न केलेलं पाहायला मनुष्याला आवडतंच. परिणामी नाटक प्रेक्षकाला भिडतं. अंतर्मुख व्हायला भाग पाडतं. त्यातल्या पात्रांमध्ये आपणही दडलेलो आहोत, ही कबुली (स्वत:च्या मनाशी का होईना!) द्यायला लावतं. या अर्थानं ‘स्पिरिट’ हे नाटक वर्तमानाचा आरसा आहे म्हटलं तर अतिशयोक्त ठरू नये. दिग्दर्शक या नात्यानं लेखक म्हणून आपणच निर्माण केलेल्या पात्रांना विजय निकम यांनी ‘शरीर’ बहाल केलं आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यातलं, कृतीतलं खोटेपण आणि लपवेगिरी त्यांनी पोलिसी खाक्याने उघडकीस आणली आहे. त्यांनी पात्रांना दिलेल्या अभिव्यक्ती व संवादफेकीच्या लकबी इतक्या वास्तवदर्शी आहेत, की नाटक ‘घटनापूर्ण’ नाही, हे विसरून प्रेक्षक त्यांच्या संवाद-विसंवादात गुंतून जातो. भातणकर आणि त्यांच्या पत्नीमधला अ-संवादही बोचऱ्या रीतीनं निकम यांनी अधोरेखित केला आहे.

यातल्या समस्त कसलेल्या कलाकारांनी नाटकाची जातकुळी ओळखत आपली अभिनयशैली निश्चित केली आहे. यातलं एकच पात्र लेखकाचं काहीसं प्रतिनिधित्व करतं; ते म्हणजे शिपाई सदा! त्याचं वर्तन मात्र नाटकाच्या वास्तवदर्शी शैलीशी फटकून आहे. असो. माधवी जुवेकर यांनी राधाचं बनचुकेपण, तिचा आपल्या शारीर भांडवलावर असलेला अदम्य विश्वास आणि त्याचा यथोचित माज नेत्राभिनय व कमालीच्या बेफिकिरीतून व्यक्त केला आहे. संदेश उपश्याम यांचा काळे हा ‘मी नाही त्यातला’चं पालुपद लावत आपमतलब साधणाऱ्यांचा अर्क आहे. संदेश जाधव यांनीही भावनाहीन कर्कश्शतेचा आधार घेत कोरडाठाक वाघ छान वठवला आहे. भातणकरांचं पाताळयंत्री रूप राजेश देशपांडे यांनी संयमित शैलीत साकारलं आहे. लौकिक यशाने अध:पतित झालेल्या बेमुर्वतखोर पुरुषाच्या पत्नीची घुसमट व असह्य़ कोंडमारा तसंच पार्टीतल्या मानखंडनेनं झालेला त्याचा स्फोटक उद्रेक श्रद्धा मोहिते यांनी लक्षवेधी केला आहे. सोहनीचं बिनकण्याचं मतलबी व्यक्तिमत्त्व मंगेश साळवी यांनी भन्नाट साकारलंय. जुन्या पठडीच्या भावनाशील पेठेंचं दु:ख समीर पेणकरांनी देहबोलीतून समूर्त केलं आहे. राजदत्त तांबे (सदा), रसिका वेंगुर्लेकर (श्रद्धा), विक्रांत शिंदे (हेड वेटर) आणि सुमीत सावंत (वेटर) यांनीही आपली कामं चोख केली आहेत.

संदेश बेंद्रेंचं पंचतारांकित हॉटेलचं नेपथ्य, परिक्षित भातखंडेंचं नाटय़ांतर्गत ताण दर्शवणारं पाश्र्वसंगीत, शीतल तळपदेंची विचारी प्रकाशयोजना, महेश शेरला यांची पात्रांना ‘चेहरा’ बहाल करणारी वेशभूषा आणि मिलिंद कोचरेकरांची रंगभूषा यांनी ‘स्पिरिट’च्या निर्मितीमूल्यांत मोलाची भर टाकली आहे.

वर्तमान स्थितीवर जळजळीत क्ष-किरण टाकणारं हे नाटक आपल्यातल्या संवेदनशीलतेची कसोटी पाहण्याकरता तरी नक्की पाहायला हवं.

– रवींद्र पाथरे