‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ असे म्हणतात. वेगवेगळ्या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आजची स्त्री काम करताना दिसत असली, स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व तिने निर्माण केले असले तरीही तिचे स्त्रीपण आणि स्त्री म्हणून येणाऱ्या समस्यांपासून तिची सुटका झालेली नाही. त्यामुळे ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ हे कमी-अधिक प्रमाणात स्त्रियांच्या बाबतीत आजही खरे ठरताना दिसते. पण स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही वेगवेगळ्या आघाडय़ांवर लढावे लागते. घरातील कर्ता पुरुष तसेच ‘पती’, ‘मुलगा’ आणि ‘वडील’ ही नाती सांभाळण्याचे आव्हान त्याच्यापुढे असते. ही सर्वच नाती सांभाळताना त्यालाही तारेवरची कसरत करावी लागते. त्याचेही काही दु:ख असते. पण अनेकदा एक पुरुष म्हणून तो ते मनातल्या मनातच ठेवतो. सुमतीलाल शहा व ‘सिक्टीन बाय सिक्टी फोर’ प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या आणि ‘एव्हरेस्ट एन्टरटेंटमेंट’ची प्रस्तुती असलेल्या ‘बापजन्म’ या आगामी चित्रपटात अशाच एका वडिलांची कहाणी उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आजच्या काळातील वडिलांची गोष्ट

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
How Sudha Murthy cope with menopause
“एकदिवस अचानक मला मुलांची आठवण आली अन् रडू आले”; सुधा मूर्ती यांनी सांगितला मेनोपॉजदरम्यान अनुभवलेला प्रसंग
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

या चित्रपटाचे खास वैशिष्ठय़ म्हणजे मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीवर यशस्वी ‘दिग्दर्शक’ म्हणून प्रसिद्ध असलेले निपुण धर्माधिकारी यांनी ‘बापजन्म’चे दिग्दर्शन केले आहे. ‘अमर प्रेम स्टुडिओ’ हे त्यांनी दिग्दर्शित केलेले नाटक रंगभूमीवर सुरु आहे. ‘भारतीय डिजिटल पार्टी’साठी सादर केलेली ‘कास्टिंग काऊच विथ अमेय अ‍ॅण्ड निपुण’ ही वेब सिरीजही लोकप्रिय ठरली होती. ‘बापजन्म’हा धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेला दुसरा चित्रपट असला तरी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणारा तो पहिला चित्रपट ठरणार आहे. दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. मराठी चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविलेले अभिनेते सचिन खेडेकर यांची एक वेगळी भूमिका ‘बापजन्म’मध्ये आहे. मराठी, हिंदूी आणि इतर भाषेतील काही चित्रपट मिळून खेडेकर यांचा हा शंभरांवा चित्रपट आहे. आणखी खास बाब म्हणजे ज्येष्ठ गायक पं. वसंतराव देशपांडे यांची नात दिप्ती माटे या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी रुपेरी पडद्यावर पाश्र्वगायिका म्हणून पदार्पण करते आहे. चित्रपटातील ‘मन शेवंतीचे फूल’ हे गाणे दिप्तीने गायले आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ प्रसिद्ध पुष्कराज चिरपूटकर याचीही चित्रपटात महत्वाची भूमिका असून चित्रपटाची गीते क्षितिज पटवर्धन यांची तर संगीत आणि पाश्र्वसंगीत गंधार संगोराम यांचे आहे. ‘बापजन्म’मध्ये सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर यांच्यासह शर्वरी लोहकरे, सत्यजित पटवर्धन, आकाश खुराणा हे ही कलाकार आहेत.

‘वडील’ या नात्याची पूर्तता

चित्रपटाच्या ‘बापजन्म’ या थोडय़ाश्या वेगळ्या वाटणाऱ्या नावाबाबत ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक निपुण धर्माधिकारी यांनी सांगितले, चित्रपटातील ‘भास्कर पंडित’ या व्यक्तिरेखेची ही गोष्ट आहे. एका वडिलांचा होणारा ‘पुनर्जन्म’ आम्ही यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मुलगा किंवा मुलगी झाली म्हणजे पुरुषाला ‘वडील’ म्हणून ओळख मिळते. पण संसारात पत्नीच्या सहकार्याने मुलांचे संगोपन करणे, त्यांची काळजी घेणे, ‘वडील’ म्हणून मुलांप्रती असलेली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे आदी जबाबदाऱ्या त्यांने यशस्वीपणे पार पाडल्या तर ‘वडील’या नात्याची पूर्तता होते. चित्रपटातील ‘भास्कर पंडित’ या व्यक्तिरेखेची ‘वडील’ म्हणून राहून गेलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या तो कसा पार पडतो, त्यासाठी त्याला काय काय करावे लागते आणि ते केल्यानंतर त्याचा पुन्हा एकदा नव्याने  ‘बापजन्म’ होतो. त्यामुळे हे नाव चित्रपटाला दिले आहे.

वडिलांचे वेगळे रुप

चित्रपटाचे वेगळेपण काय? या प्रश्नावर ते म्हणाले, भास्कर पंडित हा आजच्या आधुनिक काळातील ‘बाप’ आहे. याआधी येऊन गेलेल्या चित्रपटातून वडिलांची जशी व्यक्तिरेखा पाहायला मिळाली असेल त्यापेक्षा वडिलांचे एक वेगळे रुप यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कुटुंबातील प्रत्येकाचा हा चित्रपट असून हा चित्रपट एकाच वेळी खळाळून हसवेल आणि त्याच वेळी डोळ्यात अश्रूही आणेल. थोडय़ा रहस्याचीही फोडणी ‘बापजन्म’ला असल्याचे त्यांनी सांगितले.

नाटक, वेबसिरीज आणि चित्रपट या तीनही माध्यमातून वावरल्यानंतर नेमके आव्हान कोणत्या माध्यमात आहे, असे विचारले असता धर्माधिकारी यांनी सांगितले, तीनही माध्यमांची आव्हाने वेगवेगळी आहेत. नाटकामध्ये तुम्हाला समोरून प्रेक्षकांची प्रतिक्रिया तिथल्या तिथे मिळत असते. नाटकाचे सादरीकरण हा ‘प्रयोग’ असतो त्यामुळे तुम्हाला त्यात बदल करण्याची संधी मिळते. ‘वेब सिरीज’ हा एक वेगळा प्रकार असून तिथे वेळेचे बंधन पाळावे पाळावे लागते आणि तेही मोजक्या व नेमक्या वेळेत सादर करण्याचे बंधन असते. चित्रपटात तुमचा ‘अवकाश’ वाढतो. नाटक करताना ज्या मर्यादा असतात त्या चित्रपट करताना तुम्हाला येत नाहीत. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन तुम्हाला उत्तम प्रकारेच करावे लागते. एकदा चित्रपट संपूर्ण तयार झाला की तुम्हाला त्यात काहीही बदल करता येत नाही. ते केवळ आणि केवळ प्रेक्षकांच्या हातात असते.

आजच्या तरुणांचा चित्रपट

चित्रपटातील भास्कर पंडित ही मुख्य भूमिका अभिनेते सचिन खेडेकर करत आहेत. आपल्या भूमिकेविषयी त्यांनी सांगितले, शिस्तबद्ध आणि चाकोरीबद्ध आयुष्य जगणाऱ्या या माणसापासून त्याची मुले-कुटुंब दूर गेलेले असते. आता उर्वरित आयुष्य आपल्या मुलांबरोबर घालवावे, मुलांनी आपल्याकडे पुन्हा यावे, असे त्याला आयुष्याच्या एका टप्प्यावर वाटते. मुले आपल्याकडे परत येण्यासाठी तो काय काय करतो हे यात वेगळ्या पद्धतीने मांडले आहे. हा चित्रपट आजच्या काळातील तरुणांचा आणि कुटुंबाचा आहे. निपुण धर्माधिकारी या तरुण लेखक-दिग्दर्शकाने त्याच्या दृष्टीकोनातून चित्रपटाची मांडणी केली आहे. त्यामुळे हा आजच्या पिढीचाही चित्रपट आहे.

जुने नाते नव्या स्वरुपात

सचिन खेडेकर हे अभिनेते म्हणून एका चाकोरीत अडकले नाहीत. त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका पाहायला मिळाल्या. हे कसे जमविले? यावर खेडेकर म्हणाले, काम काय तुम्हाला मिळत जाते. तुम्ही भूमिकेची निवड कशी करता ते महत्वाचे आहे. चित्रपट संपला तरी तुमची भूमिका किंवा व्यक्तिरेखा ही प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिली पाहिजे. ते तुम्ही कसे करता याला महत्व आहे. भूमिका निवडताना मी नेहमीच या गोष्टीला अधिक महत्व देतो. हा चित्रपट  प्रेक्षकांनी का पाहावा? या प्रश्नावर खेडेकर यांनी सांगितले, नाते तेच असले तरी आजच्या आधुनिक जगात आणि सामाजिक माध्यमाच्या प्रभावात ते कसे दिसते त्याची वेगळ्या प्रकारे आणि नव्याने मांडणी ‘बापजन्म’मध्ये करण्यात आली आहे. कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र बसून पाहावा असा हा चित्रपट असून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिला या चित्रपटातून काही ना काही तरी संदेश/प्रेरणा नक्की मिळेल, असा विश्वास वाटतो.