गायन-वादनाला मिळणारी उत्स्फूर्त दाद.. कलाकार समेवर येताच डोलणाऱ्या माना.. गाणं ऐकून झाल्यावर मंडपामागच्या स्टॉलवरचं खाणं.. विविध स्टॉल्सवर शास्त्रीय संगीताच्या सीडींची केलेली खरेदी.. अशा उत्साही वातावरणात शनिवारी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात शनिवारी रसिकांच्या अलोट गर्दीने रंग भरला. रसिकांच्या उपस्थितीने मंडप खचाखच भरला होता.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६४ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात शनिवारी दुपारपासूनच रसिकांची गर्दी होऊ लागली होती. जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शिष्या धनाश्री घैसास यांच्या गायनाने महोत्सवातील चौथ्या सत्राची सुरुवात झाली. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी आणि नातू विराज जोशी यांच्या गायनाची मैफील झाली. लक्ष्य मोहन गुप्ता आणि आयुष मोहन गुप्ता या बंधूंच्या सतार आणि सरोदवादनानंतर डागर घराण्याचे पं. उदय भवाळकर यांचे धृपदगायन झाले. कर्नाटक संगीतातील डॉ. एल. सुब्रमण्यम आणि अंबी सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन सहवादनाने शनिवारच्या सत्राची सांगता झाली.

उत्तम ध्वनिव्यवस्था

महोत्सवातील ध्वनिव्यवस्थेची जबाबदारी गेल्या १८ वर्षांपासून ‘स्वरांजली’चे प्रदीप माळी सांभाळत आहेत. त्यासाठी खुद्द पं. भीमसेन जोशी यांनीच मला निमंत्रित केले होते. मात्र, त्यापूर्वी हे काम करणाऱ्या घोडे स्पीकर्सच्या चालकांची संमती असेल तरच मी हे काम करेन, असे मी त्यांना सांगितले होते, असे माळी यांनी सांगितले. १८ वर्षांपूर्वी महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे सत्र संपल्यानंतर पंडितजींनी पाठीवर शाबासकी दिली आणि ‘जिंकलंस’ एवढेच म्हणाले. माझ्यासाठी तो मोठा आशीर्वाद होता, ही आठवण सांगताना माळी यांच्या डोळ्यांतून अश्रू तरळले. गायन, तालवाद्य आणि तारवाद्य अशा सर्व प्रकारांसाठी ध्वनीची वेगळी तयारी करावी लागते. मैफील सुरू होण्यापूर्वी ग्रीन रुममध्ये जाऊन मी वाद्याची जातकुळी आणि नाद याचा अभ्यास करून त्यानुसार ध्वनिव्यवस्था करतो. माझ्याकडे अ‍ॅडमसन सिरीजची ध्वनिव्यवस्था असून त्या माध्यमातून प्रत्येक वाद्याची मंद्र, मध्य, तार आणि खर्ज असे सारे स्वर स्वतंत्रपणे ऐकू येऊ शकतात. मात्र, हा महोत्सव संपल्यानंतर पुन्हा थेट पुढील वर्षीसाठी ही यंत्रणा वापरली जाते. त्यामुळे वर्षभर ही यंत्रणा वापरात येत नाही, असेही माळी यांनी सांगितले.

मोठय़ा आकारातील जगातील एकमेव मंडप

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी ८० हजार चौरस फूट भव्य मंडप हा अभिजात संगीत मैफिलीसाठी जगातील एकमेव मंडप गोखले मांडववाले यांनी उभारला आहे. अवघ्या १२ दिवसांत ७० कामगारांनी हा मंडप उभारला असून त्यासाठी ६ हजार बांबू, ६०० वासे, ५० टन लोखंडी माल (स्ट्रक्चर, गर्डर, शिडय़ा), ७०० प्लायवूड, १० हजार मीटर कापड एवढे साहित्य लागले. दोन वर्षांपूर्वी आलेल्या पावसामुळे मंडप पत्र्यांनी आच्छादित करण्यात आला असून रमणबाग प्रशालेच्या संपूर्ण मैदानावर १ लाख चौरस फुटांचे कार्पेट टाकण्यात आले आहे, अशी माहिती आशुतोष गोखले यांनी दिली.

महोत्सवात आज

* ताकाहिरो अराई (संतूरवादन)

* पं. कैवल्यकुमार गुरव

* उस्ताद अमजद अली खाँ-अमान अली बंगश-अयान अली बंगश (सरोदवादन)

* डॉ. प्रभा अत्रे (गायन)