आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या आगामी ‘शुभ मंगल सावधान’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. आयुषमानने स्वतः ट्विट करून चित्रीकरण पूर्ण झाल्याची माहिती देत शूटिंगचा अनुभव खूपच मजेशीर असल्याचे म्हटले आहे. त्याने लिहिलंय की, ‘शुभ मंगल सावधान’चं चित्रीकरण पूर्ण झाले आहे. भूमी पेडणेकर, आर. एस. प्रसन्ना आणि आनंद एल. राय यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता.’

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. तमिळ दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित ‘शुभ मंगल सावधान’ चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय यांच्या ‘कलर यल्लो प्रॉडक्शन’अंतर्गत करण्यात येणार आहे. बिघडलेले नाते पूर्ववत करण्यासाठी पुन्हा एकत्र आलेल्या पती-पत्नीवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. आयुषमानच्या ‘विकी डोनर’ चित्रपटाप्रमाणेच ‘शुभ मंगल सावधान’मध्येही आतापर्यंत फार कमी भाष्य करण्यात आलेल्या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. ‘दम लगा के हैशा’मध्ये यापूर्वी आपल्याला आयुषमान आणि भूमीची केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. त्यामुळे या चित्रपटातही त्यांची तशीच दमदार केमिस्ट्री पाहायला मिळण्याची अपेक्षा केली जातेय.

‘शुभ मंगल सावधान’ हा हिट तमिळ विनोदी चित्रपट ‘कल्याण समयाल साधम’चा रिमेक आहे. याविषयी दिग्दर्शक प्रसन्ना म्हणाला की, ‘कल्याण समयाल साधम’ याचा हा पूर्णपणे रिमेक असल्याचं मी म्हणणार नाही. या चित्रपटाच्या कथेचा गाभा तोच असला तरी याची मांडणी पूर्णपणे वेगळी आहे. ‘अध्यात्मिक बदल’ हा शब्द यासाठी योग्य राहिल.

बॉलिवूडमधील पदार्पणानंतर भूमी पेडणेकरचा हा तिसरा चित्रपट आहे. खिलाडी अक्षय कुमारसोबत ती ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल. तर, आयुषमान खुराना लवकरच ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटातून झळकणार आहे. यात त्याच्यासोबत परिणीती चोप्राने मुख्य भूमिका साकारली आहे.