‘बाहुबली २’ या चित्रपटाची भव्यता, प्रभास, राणा डग्गुबती आणि दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्याविषयी सध्या सर्वाधिक चर्चा होते आहे. त्यामानाने चित्रपटातील स्त्री पात्रांकडे दुर्लक्ष केले जातेय. राजामौलीच्या या बहुचर्चित चित्रपटात अभिनेत्री रम्या कृष्णन हिने बाहुबलीच्या आईची भूमिका साकारली आहे. माहिष्मती साम्राज्याचा डोलारा आपल्या खांद्यावर सांभाळणाऱ्या निडर राजमातेची व्यक्तिरेखा तिने ‘बाहुबली द बिगनिंग’मध्ये लीलया साकारली होती. मात्र, चित्रपटात एक दृश्य करताना रम्या खूप घाबरलेली.

शिवगामी (रम्या) एका हातात बाळाला पकडून पाण्यात उभी असलेले थरारक दृश्य छलकुडी धबधब्यात चित्रीत करण्यात आले होते. हे दृश्य करणे रम्यासाठी खूप कठीण होते. याविषयी ती म्हणाली की, मी पाण्याच्या आत असताना एका हातात बाळाला पकडून मला दृश्य चित्रीत करायचे होते. पाण्याचा प्रवाह अगदी जोरदार होता आणि त्याच परिस्थितीत मला पाण्याच्या पूर्ण आत राहून दृश्य चित्रीत करायचे होते. केरळमधील छलकुडी धबधबा खूप सुंदर आहे. पण, अशी थरारक दृश्य त्या धबधब्यात चित्रीत करणं कठीण काम होतं. त्या प्रवाहात मी बुडून जाईन की काय असा विचारही तेव्हा माझ्या मनाला शिवून गेला. पण, काहीही झालं तरी माझ्या चेहऱ्यावर निडर भावचं दिसले पाहिजेत असं मला राजामौलीनं सांगितलं होतं. त्यामुळे पाण्याच्या आत दृश्य चित्रीत करताना मी खूप घाबरलेले. मात्र, पाण्याबाहेर पडताच माझ्या चेहऱ्यावर शूरवीरासारखे भाव होते.

रम्यासाठी ‘बाहुबली’ चित्रपटाचा अनुभव चित्तथरारक असा होता. पण, याचसोबत तिने आणखी एका गोष्टीचा खुलासा केला. नेहमी चित्रपटाची कथा ऐकताना रम्याला झोप येते. पण, राजामौली जेव्हा तिला बाहुबलीची कथा ऐकवत होते तेव्हा त्या कथेत ती पूर्णपणे गुंतून गेली होती. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ‘बाहुबली’ हा एकमेव चित्रपट आहे ज्याची कथा ऐकताना मला झोप आली नाही, असे रम्याने सांगितले.