‘बाहुबली २’ सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. १८ व्या ‘मुंबई चित्रपट महोत्सवा’मध्ये आणि सिनेमाचा मुख्य अभिनेता प्रभासच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. सिनेमाचे पोस्टर फार दमदार आहे. या पोस्टरमध्ये प्रभास एका हातात जड साखळी तर दुसऱ्या हातात तलवार घेऊन उभा असलेला दिसत आहे. त्याच्या नजरेत राग आणि दुःख दोन्ही दिसत आहे. गळ्यात लॉकेट आहे आणि शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झालेल्या दिसत आहे. व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचे झाले तर बाहुबलीच्या दुसऱ्या भागात प्रभास पहिल्यापेक्षा अधिक तंदुरुस्त दिसत आहे. या पोस्टरमध्ये प्रभासच्या मागे पहिल्या भागातल्या बाहुबलीची छबी आकाशात चमकणाऱ्या वीजेसोबत दिसत आहे.

या सिनेमाच्या क्लायमॅक्सचे शूटिंग हैदराबादमध्ये केले गेले आहे. सांगण्यात येत आहे की, या सिनेमाचे संपूर्ण शूटिंग नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल आणि या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी प्रेक्षकांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही. सिनेमाच्या पहिल्या भागाचा ट्रेलर अनेकांना आवडला होता. त्यामुळे या दुसऱ्या भागाचा ट्रेलरही अनेकांना आवडेल अशी अपेक्षा केली जात आहे. बाहुबली सिनेमाने फक्त भारतातच नाही तर विदेशातही आपल्या नावाचा बोलबाला गाजवला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले होते. कला दिग्दर्शक साबू सायरिल यांनी ‘बाहुबली २’ साठी नवीन साम्राज्य उभं केलं आहे. ‘बाहुबली २’ साठी बनलेल्या या नवीन साम्राज्यचे फोटोही काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले होते. ‘बाहुबली २’ चा हा सेट बनवण्यासाठी सुमारे ३०० ते ५०० कामगार वापरण्यात आले होते.

baahubali-first-look-inside

‘बाहुबली’च्या पहिल्या भागात कटप्पाने बाहुबलीला मारले होते. पण चाहत्यांना कटप्पाने बाहुबलीला का मारले याचे उत्तर मात्र मिळाले नव्हते. सिनेमाच्या या शेवटाची चर्चा आजपर्यंत अनेकजण करताना दिसतात. आतापर्यंत यावर अनेक विनोदही सोशल मीडियावर फिरत होते. पण नेमकी याचे कारण जाणण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पण आता प्रेक्षकांना या उत्तरासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही. कारण हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.