अतरंगी अभिनेता म्हणून रणवीर सिंग बॉलिवूडमध्ये ओळखला जातो. प्रत्येक वेळी काही ना काही अतरंगी गोष्टी करून किंवा विचित्र कपडे घालून हा अभिनेता सर्वांचे लक्ष वेधत असतो. त्यामुळेच त्याच्या चाहत्यांचीही संख्या बरीच आहे. ट्विटर असो वा इन्स्टाग्राम रणवीरने त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही असे होत नाही. नुकताच त्याच्यावर ‘पद्मावती’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. मात्र, यावेळी हा अभिनेता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.

वाचा : जाणून घ्या, ईदला प्रदर्शित होणाऱ्या सलमानच्या ‘भारत’ चित्रपटाविषयी..

झालं असं की, रणवीर एका इमारतीतून बाहेर येत असतानाच त्याच्या चाहत्यांनी त्याला गाठले. आपल्या चाहत्यांची निराशा न करता ‘बाजीराव मस्तानी’ फेम अभिनेत्याने सर्वांसोबत सेल्फी काढून त्यांना खूश केले. प्रत्येकजण यावेळी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी उत्सुक होता. सर्वांना सेल्फी दिल्यानंतर रणवीर त्याच्या गाडीकडे वळला तोवर एक भटजी बुवा त्याच्यासमोर आले. भटजींचा आदर राखत त्याने त्यांना नमस्कार केला. भटजींनीही मंत्रोपचार करून त्याला यशस्वी वाटचालीसाठी आशीर्वाद दिला. यानंतर अनेकांनी रणवीरशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. त्याचवेळी एक भिकारी तिच्या मुलासह तेथे आली आणि तिनेही आपल्या आवडत्या अभिनेत्याला हात मिळवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यावर आपल्या या चाहतीची निराशा न करता रणवीरने तिला हात मिळवला आणि तो गाडीत जाऊन बसला.

वाचा : मी केवळ शारीरिक गरजेसाठी तिचा वापर केला- नवाजुद्दीन

रणवीरच्या याच स्वभावामुळे त्याचे असंख्य चाहते आहेत. हरफनमौला आणि बिनधास्त व्यक्तिमत्व असलेला हा अभिनेता तरुण मुलींच्या गळ्यातील ताईत आहे. त्याचप्रमाणे आपल्या स्टाइल स्टेटमेंटमुळे तो तरुणांमध्ये ‘स्टाईल आयकॉन’ म्हणून प्रसिद्ध आहे.