एस्कलेटरवरून वर जात जात तो थांबतो आणि मागे वळून पाहताना म्हणतो, “मलै डा…अण्णामलै!” पंचवीस वर्षांनी ‘कबाली’मध्ये तीच अंगकाठी, तोच त्वेष आणि तीच लकब. “कबाली डा…!” या पंचवीस वर्षांत दुनिया किती बदलली! कावेरीच्या पाण्यासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारे तमिळनाडू-कर्नाटक जवळ आले, स्वस्तात असते म्हणून रात्री एसटीडी फोन करणारी माणसे व्हाट्स अपवर नेटपॅक वापरून व्हिडियो पाहायला लागली, केंद्रात अर्धा डझन आणि तमिळनाडूत पाच सरकारे बदलली. फक्त बदलली नव्हती एकच गोष्ट – जनसामान्य प्रेक्षकांचा जवळपास देव असलेला आणि समस्त चित्ररसिकांना अचंबित करणारा तो रजनीकांत एक!

इमारतीच्या वास्तुशास्त्रात ज्या प्रमाणे प्रत्येक गोष्ट ठरलेली असते, त्या प्रमाणे रजनीच्या चित्रपटाची रचनाही ठरलेली. दरवाजा, खिडकी, छत, खोली यांच्या आकारावरून जशी इमारतीची मागची पुढची बाजू ठरते, त्याच प्रमाणे रजनीच्या चित्रपटातील ‘अरिमुगम पाट्टु’ (परिचय गीत), मातृ-पितृ भक्ती, एक दोन सुविचार, एक ठराविक पंच डायलॉग (मर्मवाक्य), काही मारामाऱ्या, काही विनोद आणि खलनायकाचा खात्मा असा हा साचा होता. या सगळ्या ढाच्यावर जी इमारत उभी राहायची त्याला रजनीपडम (रजनीपट) हे नाव होते. यातील कथा, वळणे आणि संदेश या ठरलेल्या असल्या तरी ते कसे केले आहे, हे पाहण्यासाठी रजनीभक्तांची झुंबड थेटरांबाहेर उडत असे. थिल्लरपणा म्हणून काही जणांचे नाक वाकडे होत असले, तरी या थिल्लरपणातील निरागसतेचा आनंद घेण्याचे बालमन ज्यांनी जपले होते त्यांनी आनंदाने वर्षानुवर्षे ते गोड मानून घेतले. नव्हे, अभिमानाने हा थिल्लरपणा मिरविलाही.

आपल्याकडे ज्या प्रमाणे रामनवमी, हनुमान जयंती इ. प्रसंगी ‘मंडळी, प्रतिवर्षाप्रमाणे आपण हा उत्सव साजरा करायचा असून यंदा तो वेगळ्या पद्धतीने करायचा आहे,’ अशी प्रस्तावना होते, तसाच हा प्रकार होता. उत्सव तोच, सोहळा तोच. वेगळेपण फक्त त्या साजरे करण्यात असते. रजनीपटाची पद्धत यापेक्षा वेगळी नव्हती. ठराविक रुळांवरून जाणाऱ्या रेल्वेगाडी प्रमाणे चित्रपटाचा प्रवास व्हायचा आणि उतारू प्रवासाची गंमत घेऊन बाहेर पडायचे.

‘कबाली’ने जणू हे चित्र बदलायचा प्रयत्न केला आहे. अगदी आरंभी आरंभीच्या ‘मुळ्ळुम मलरुम’ (1977) किंवा ‘एंगेयो केट्ट कुरल’मध्ये (1979) दिसलेल्या अभिनेता रजनीचे दर्शन यात होते. यात लकबी नाहीत, लय आहे. नखरा नाही, नजरबंदी आहे. खरे सांगायचे तर कट्टर रजनीपंथियाला न झेपणारा असा हा बदल आहे. आपल्याकडे अलीकडे संयत चित्रपटाच्या नावाखाली मनहूस चित्रांची मालिका उभी करण्याची टूम आलेली आहे. मनहूस चेहरे, मुडदूस झाल्याप्रमाणे गप्पगार पडलेली माणसे असे या चित्रपटांचे लाक्षणिक वैशिष्ट्य असते. रजनीसारखा शैलीदार अभिनेताही या प्रवाहात वाहून गेला आहे, असेही रजनीभक्त म्हणू शकतो.

ते म्हणणार नाहीत याचे एकमेव कारण म्हणजे रजनीकांत नावाच्या अद्भूत अभिनेत्याचा पडद्यावरील वावर. पहिल्या दृश्यापासून नजरेने आणि देहबोलीने बोलणारा रजनीकांत रजतपट ओलांडून दशांगुळे उरून राहतो. सिगारेटची फेकाफेकी आणि गॉगलची फिरवाफिरव करणारा रजनी डोक्यात ठेवून जाणारे प्रेक्षकही हा असाही काम करू शकतो म्हणून निःशब्द होऊन येतील. तर त्याचा विनोद आणि हाणामारी पाहण्यासाठी जाणारे रजनीपंथीय आपल्या पंथाचा प्रेषितच आपल्या मार्गापासून ढळला म्हणून खट्टू होतील.

कथा सांगायची तर मलेशियातील तमिळ लोकांच्या हक्कासाठी, चीनी लोकांच्या समान दर्जा मिळावा यासाठी लढा देणारा एक धाडसी माणूस अनिच्छेने आणि परिस्थितीच्या रेट्याने गुंड बनतो. पंचवीस वर्षे तुरुंगात काढल्यानंतर आपल्या कुटुंबाचा शोध घेतो आणि शेवटी शत्रूंना संपवितो अशी सांगता येईल. या दरम्यान जी वळणे असतात, जे खटकेदार संवाद (‘तुझ्याकडे सत्तेची शक्ती आहे, माझ्याकडे जनतेची शक्ती आहे. माझ्या शक्तीपुढे तुझी शक्ती जुजुबी आहे’ – पडैयप्पा किंवा ‘जीवनात भय असावे, पण भय म्हणजेच जीवन बनता कामा नये’ – बाशा) असतात त्यांचा येथे सपशेल अभाव आहे. त्यामुळे कबालीचे वैयक्तिक दुःख आणि त्याच्या समाजाची वेदना या दोन चाकांवर संथ गतीने चित्रपटाचा गाडा पुढे जात राहतो.

नेहमीप्रमाणे रजनीकांत या चित्रपटात असल्यामुळे अन्य लोकांना करण्यासारखे काही नाहीच. अन् विनोदवीरांचा तर संपूर्ण अभाव आहे. सेंथिल, वडिवेलू आणि गौंडमणी यांच्यासारख्या विनोदवीरांसोबत रजनीने हास्याचे धबधबे निर्माण केलेले पाहिलेत, त्यांना तर हे आणखी कष्टप्रद आहे. विनोदाचा एवढा तिटकारा तर एनएफडीसीच्या पैशांवर चित्रपट काढणाऱ्या ‘कलात्मक’ दिग्दर्शकांनाही नव्हता.

कबाली का आणि कोणी पाहावा – तर रजनीकांतही अभिनय करू शकतो, याचा पुरावा ज्यांना पाहिजे त्यांनी तो जरूर पाहावा. पिस्तुल, सिगारेट आणि गॉगल यांच्या पलीकडेही एक रजनीकांत आहे, याचा अस्सल दाखला या चित्रपटाने दाखविला आहे.कथा थोडीशी वेगवान असती आणि ‘मनोरंजन म्हणजे पाप, मख्खपणा म्हणजे कलात्मकता’ या अंधश्रद्धेला बळी न पडता बनला असता, तर हा चित्रपट आताचा अन्नामलै बनला असता, यात शंका नाही.

एकुणात काय, तर ‘रजनीपडम’मध्ये सबकुछ रजनी असल्यामुळे उरायचा तो रजनीकांत. अन् आता फेस्टिव्हलछाप संयत चित्रपट काढला, तरीही त्याची भट्टी चुकल्यामुळे परत उरतो तो रजनीकांत एकच!