एखादी मोठी घटना म्हणजे एक प्रकारचे कळत नकळत लोकशिक्षणच! आपला चित्रपट ऑस्करला पाठवणे ही गोष्टदेखील अगदी अशीच. फार पूर्वी मेहबूब खान यांच्या ‘मदर इंडिया’चे (१९५८) ऑस्कर अवघे काही गुण कमी पडल्याने हुकल्याची चर्चा काही काळ झाली. अन्यथा ‘आपल्या चित्रपटासाठी ऑस्कर’ ही कल्पनाच आपण करीत नसू. केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी ऑस्करसाठी हिंदी अथवा एखाद्या प्रादेशिक चित्रपटाची निवड होई. नव्वदच्या दशकात तर मराठी चित्रपट आणि ऑस्कर? काहीतरीच काय? अशा थट्टेच्या सुरात परिसंवादाचे विषय घेतले जाई. तात्पर्य ऑस्करपासून आपला चित्रपट गुणवत्तेमुळे खूपच दूर आहे असाच एकंदरीत सूर होता. वर्षभरात विविध भाषांतील मिळून ९००-१००० चित्रपट निर्माण करणारी आपली चित्रपटसृष्टी फक्त संख्याबळाने ओळखली जाते असेही हिणवले जाई. विशेषत: समांतर चित्रपट व जागतिक चित्रपट यांचे समर्थक आपल्याकडचा चित्रपट अजूनही वास्तव विषयाचे गांभीर्य समजलेला नाही व दृश्य माध्यमाची ताकद जाणू शकलेला नाही, असे अधोरेखित होत होते .

ही परिस्थिती बदलण्याजोगे काही घडणे नेहमीच आवश्यक असते. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान'(२००१) ते अमित मसुरकर दिग्दर्शित ‘न्यूटन’ (२०१७) या प्रवासात ते घडलंय. तरी नेमके काय? ‘लगान’च्या वेळेस ऑस्करला चित्रपट पाठवला इतक्यावरच प्रवेश थांबला नाही. तर आशुतोष गोवारीकर अमेरिकेत गेला. त्याने ऑस्करसाठीचे सगळेच नियम व प्रक्रिया समजून घेऊन मग तशी सकारात्मक पावले टाकली. तरीही येथे असा गीत-संगीत-नृत्याचा चित्रपट ऑस्करला पाठवणे योग्य आहे काय, यापासून ते त्याचे कथेचे सूत्र एका विदेशी चित्रपटावर आधारित आहे, असाच काहीसा सूर होता. खरंतर आशुतोष व ‘लगान’ यांना प्रोत्साहन देण्याची गरज होती. आशुतोषच्या प्रयत्नांना यश मिळतयं हे पाहून सामाजिक सांस्कृतिक वातावरण बदलतं गेले. ही तशी दीर्घकालीन प्रक्रिया होती. (त्यात कालांतराने बदल झालाय) पूर्वी ऑस्कर परीक्षक स्वतंत्रपणे चित्रपट पाहून गुण देत पण त्यांनी आपला चित्रपट पाहायला हवाच यासाठीच प्रयत्न करावा लागे. यात आशुतोष गोवारीकर यशस्वी ठरला.

‘लगान’ला ऑस्करच्या विदेशी चित्रपट विभागात नामांकन मिळताच कौतुकाचा सूर वाढला. आपल्या एकूणच चित्रपटसृष्टीसाठी हे उत्साहजनक ठरले. प्रत्यक्ष निकालाच्या थेट प्रक्षेपणाच्या वेळेस सकाळीच आमिरच्या कार्यालयात ‘लगान संघ’ उत्साहाने बसला. पारितोषिक हुकले तरी ही झेप बरेच काही घडवणारी ठरली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑस्कर, आपला चित्रपट व आपला प्रेक्षक या तिघांमधील अंतर कमी झाले. तसे घडणे गरजेचे होते. आपल्याकडे ऑस्करच्या स्पर्धेत उभा राहण्याजोगा चित्रपट निर्माण होऊ शकतो हा यातील विश्वास खूप महत्त्वाचा होता. ‘लगान’नेच समांतर व व्यावसायिक चित्रपट यातील अंतर आणखीन कमी केले. त्याची सुरुवात ‘सत्या’ (१९९८) पासून झाली.

‘लगान ते न्यूटन’ या प्रवासातच ‘देवदास’ (२००२) फिट बसतो काय? या निमित्त संजय लीला भन्साळीचे भरपूर कौतुक झाले. पण प्रत्यक्षात अमेरिकेत जाऊन काही प्रयत्न वगैरे केल्याची चर्चा नाही. अमोल पालेकरच्या ‘पहेली’ऐवजी आशुतोष गोवारीकरचा ‘स्वदेश’ (२००४) ची निवड योग्य ठरली असती असाही सूर होता.

मराठी चित्रपटाला ऑस्कर न मिळताच त्याचा भरभरून फायदा झाला. संदीप सावंत दिग्दर्शित ‘श्वास’ची (२००३) या स्पर्धेसाठीची निवड ‘ब्रेकिंग न्यूज’ ठरली. तत्पूर्वीची काही वर्षे एकूणच मराठी चित्रपटाला फारसे भवितव्य नाही. उपग्रह वाहिन्यांवरील २४ तास मनोरंजन मराठी चित्रपटाला गिळंकृत करेल अशा चर्चा होत्या. ‘श्वास’ने हे नकारात्मक वातावरण घालवले. मराठी चित्रपटावर भरभरून प्रेम करणारे यामुळे थोडेसे भाऊकही झाले व आनंदलेही! इतर भाषिक प्रेक्षक मराठी चित्रपटाकडे आदराने पाहू लागले. ‘श्वास’ टीमला समाजाच्या खूप सदिच्छाही मिळाल्या. अग्रलेखातूनही या घटनेची दखल घेतली गेली. सगळेच चित्रपट येतात-जातात असे नव्हे तर काही चित्रपटांबाबत असेही काही घडते. ‘श्वास’ ऑस्करच्या प्राथमिक फेरीत बाद झाला तरी तो बरेच काही घडवणारा ठरलाय. एकूणच मराठी चित्रपटाला संजीवनी देण्यापासून त्यात अनेक घटक सामावलेत. परेश मोकाशीचा ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ (२०१०), चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ (२०१४) हे ऑस्करसाठी पाठवले गेले पण नामांकनपर्यंत पोहोचू शकले नसले तरी इतर काही महत्वाच्या गोष्टी यातून घडल्या. ‘… फॅक्टरी’च्या विषयाची निवड खूपच महत्त्वाचा घटक होता. दादासाहेब फाळके यानी आपल्या देशातील पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ (१९१३) निर्मितीसाठी घेतलेला ध्यास व केलेला संघर्ष हा चित्रपटाचा विषय बनू शकेल याचा तोपर्यंत कोणी विचारच केला नव्हता. अन्य भाषिक प्रेक्षकांपर्यंतही हा चित्रपट पोहोचला. ‘कोर्ट’ निवडीच्या वेळेस वेगळाच मुद्दा उपस्थित झाला. तोपर्यंत तो प्रदर्शित झाला नसल्याने त्याची निवड कितपत योग्य हा वादाचा विषय ठरला. असे प्रेक्षकांपर्यंत न पोहोचलेले चित्रपट ऑस्करला का पाठवावेत असा टीकेचा सूर होता. त्यानिमित्त आपल्या निवड समितीबाबत चर्चा घडून आली. तर ‘कोर्ट’ प्रदर्शित होताच काहीना तो अजिबातच न आवडल्याने याच निवड समितीच्या निर्णयावर काहीनी शंका उपस्थित केली. हे सगळे एकमेकांत गुंतलय व त्यातूनच आपण व ऑस्कर पुरस्कार यातील अंतर कमी होत गेले. एव्हाना उपग्रह वाहिन्यांवर हा ऑस्कर सोहळा लाईव्ह पाहता येऊ लागला तर सोशल नेटवर्किंग साइटवर अनेक जण आपले मत मांडू लागले. माध्यमांची वाढ व प्रवास आणि ऑस्करमधील आपला चित्रपट ही वाटचाल दुर्लक्षित करता येणार नाही. ‘लगान’ च्या वेळेस त्याचे ऑस्करला जाणे कुतूहल व कौतुकाचे होते. ‘न्यूटन’ च्या वेळेस ही निवड योग्य की अयोग्य याचा विचार करण्यास चित्रपटगृहात ‘न्यूटन’ झळकत आहे. म्हणजेच चित्रपट पाहून रसिक प्रेक्षक या निवडीवर स्वतःचे मत मांडू शकतात. भविष्यात प्रेक्षकांकडून मते मागवून ऑस्करसाठीचा चित्रपट निवडला जाईलही. ते अधिकच समर्पक ठरेल. त्यातून आपला प्रेक्षक चांगला चित्रपट व ऑस्कर पुरस्कार प्रक्रिया याच्याशी अधिकच जोडला जाईल. आजचा प्रेक्षक सबटायटल्सच्या माध्यमातून विविध भाषांतील चित्रपट पाहतोय. अगदी दक्षिणेकडील भाषिक चित्रपट त्याला व्यर्ज नाहीत. सध्या हिंदीत छोट्या छोट्या विषयांवर अनेक चित्रपट निर्माण होत आहेत त्याला ‘न्यूटन’ने अधिकच चालना मिळेल. प्रत्यक्ष त्याला ऑस्कर पुरस्कार लाभावा यासाठी शुभेच्छा आहेतच. पण त्याव्यतिरिक्त देखील बरेच काही घडत असते, ऑस्करसाठी आपला चित्रपट पाठवला जातो या प्रक्रियेतील हा खूपच महत्वपूर्ण घटक आहे.
– दिलीप ठाकूर