नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ या चित्रपटाच्या कमाईचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. जवळपास नऊ महिने उलटले असूनही चित्रपटाची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही असंच म्हणावं लागेल. मुख्य म्हणजे या बॉलिवूड चित्रपटाचे फक्त भारतातच नाही तर परदेशातील प्रेक्षकांच्याही मनावर राज्य केलं आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार आमिर खान, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘दंगल’ या चित्रपटाने हाँगकाँगमध्ये २३.४५ मिलियन हाँगकाँग डॉलर्सची कमाई केली असून, भारतीय रुपयानुसार हा आकडा २० कोटींच्या घरात जात आहे. हाँगकाँगमध्ये विक्रमी करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांच्या यादीत ‘दंगल’ अग्रस्थानी पोहोचला आहे.

‘बॉक्स ऑफिस इंडिया’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधीची माहिती देण्यात आली. आमिरच्याच ‘३ इडियट्स’ या चित्रपटाचा विक्रम ‘दंगल’ने मोडीत काढल्याचंही या ट्विटमध्ये म्हटलं गेलं आहे. हाँगकाँगमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने ५.२ हाँगकाँग डॉलर्सची कमाई केली होती. २४ ऑगस्टला ‘दंगल’ हाँगकाँगमध्ये प्रदर्शित झाला असून, आतापर्यंत या चित्रपटाने जागतिक पातळीवरही तगडी कमाई केली आहे. याआधी आमिर खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘३ इडियट्स’ या चित्रपटाने हाँगकाँगमध्ये २३.४२ मिलियन हाँगकाँग डॉलर्सची कमाई केली होती.

वाचा : २७ मे १९९४ ला होणार होतं सलमानचं लग्न, पण…

‘दंगल’मध्ये कुस्तीसारख्या पुरूषी खेळात नाव कमावलेल्या फोगट बहिणींची संघर्षपूर्ण कथा मांडण्यात आली आहे. दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय, पार्श्वसंगीत अशा सर्वच बाबतीत हा चित्रपट उजवा ठरला होता. परफेक्शनिस्ट आमिरने या चित्रपटातील भूमिका साकारण्यासाठी बरीच मेहनत घेतली होती. त्याने साकारलेल्या महावीर सिंग फोगट या भूमिकेची अनेकांनीच प्रशंसाही केली होती. परदेशात सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटाच्या यादीत या चित्रपटाला अव्वल स्थान मिळाले आहे. ‘दंगल’ने गेल्या वर्षी सर्वाधिक व्यवसाय केला असून, तैवानी मार्केटमध्येही ३६.५० कोटींची कमाई केली होती.