संजल लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्याच चर्चा सध्या सर्वदूर होत आहेत. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, शाहिद कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून पुन्हा एकदा इतिहासाची पानं उलटली जाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाविषयी बरंच कुतूहल पाहायला मिळत आहे. रणवीर या चित्रपटातून क्रूर सुलतान अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत झळकणार असून त्याच्या अभिनयाचा वेगळा पैलू पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. या भूमिकेसाठी रणवीर प्रचंड मेहनत घेत आहे. इतकच काय तर चित्रीकरणादरम्यान त्याला अनेक दुखापतींचाही सामना करावा लागला होता.

एखाद्या कलाकाराला दुखापत होते तेव्हा सहसा चित्रीकरण थांबवण्यात येतं. पण, ‘पद्मावती’च्या सेटवर मात्र असं काहीच घडलं नाही. कारण एका महत्त्वाच्या दृश्याच्या चित्रीकरणाच्या वेळी रणवीरच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर रणवीरने थेट रुग्णालयात धाव घेतली. पण, प्राथमिक उपचारांनंतर तो पुन्हा चित्रपटाच्या सेटवर आला होता. डोक्यावर झालेली जखम भरलेली नसतानाही त्याने चित्रीकरण पूर्ण केलं कारण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते दृश्य चित्रपटाच्या क्लायमॅक्ससाठी चित्रीत करण्यात येत होतं.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

डोक्यावर जखम असतानाही रणवीर सेटवर आला आणि त्याने चित्रीकरण केलं. त्या दुखापतीमुळे होणाऱ्या वेदना आणि एकंदर त्रास रणवीरच्या देहबोलीतून, त्याच्या चेहऱ्यावरुन व्यक्त होत होता. तरीही त्याने अभिनय करणं सुरुच ठेवलं. मुख्य म्हणजे त्या दृश्यासाठी ज्या प्रकारचे भाव चेहऱ्यावर आणण्याची गरज होती ते भाव कोणत्याही प्रयत्नांशिवाय रणवीरच्या चेहऱ्यावर आपसुकच उमटले होते आणि याला कारणीभूत ठरली ‘ती’ दुखापत. कलाकारांच्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी त्यांच्या कामासाठी पूरक असतात याचाच प्रत्यत रणवीरला त्याच्या या अनुभवातून आला असावा असं म्हणायला हरकत नाही.