आर. के. स्टुडिओला लागलेल्या आगीनंतर एका प्रसिद्ध वृत्तपत्रावर ऋषी कपूर यांनी नाराजी व्यक्त केली. १६ सप्टेंबरला मुंबईतील चेंबूर परिसरात असलेल्या आर. के. स्टुडिओला आग लागून पहिल्या क्रमांकाच्या स्टुडिओचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या घटनेनंतर चित्रपटसृष्टीतूनही दु:ख व्यक्त करण्यात आलं. पण, या गंभीर घटनेचं विडंबनात्मक चित्र काढून ते प्रसिद्ध करणं ही बाब काही ऋषी कपूर यांना रुचली नाही. त्यामुळे त्यांनी ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची नाराजी व्यक्त केली.

‘या खालच्या पातळीवरील विनोदी शैलीची मी निंदा करतो. ही किती वाईट गोष्ट आहे’, असं ट्विट करत ऋषी कपूर यांनी त्या रेखाचित्रावर आक्षेप घेतला. हे ट्विट करताना त्यांनी त्या रेखाचित्राचासुद्धा फोटो जोडला. ज्यामध्ये राज कपूर आणि आर. के. स्टुडिओचं चित्रं रेखाटण्यात आलं असून, त्यांच्या ‘आग’ या चित्रपटाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

‘आग’ हा आर. के. स्टुडिओ या बॅनरअंतर्गत साकारलेला पहिलाच चित्रपट होता. त्याचाच संदर्भ देत हे चित्र रेखाटण्यात आलं. पण, अशा गंभीर प्रसंगी चौकटीबाहेरील विचार मांडण्याच्या आणि काहीतरी नवं करण्याच्या प्रयत्नात इतर गोष्टींचा विचार न केला गेल्यामुळेच ऋषी कपूर यांनी नाराजी व्यक्त केली.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

चित्रपटसृष्टीत राज कपूर यांच्या अमूल्य योगदानाला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व आर. के. स्टुडिओलाही देण्यात येतं. चित्रपटसृष्टीचा इतिहास स्वत:त सामावून घेणाऱ्या या वास्तूचं अशा प्रकारे नुकसान झाल्यामुळे सर्व कपूर कुटुंबियांना दु:ख झालं होते. ‘आम्ही चार भिंती आणि छत उभारुन नवा स्टुडिओ उभा करु. पण, त्या आठवणींचं काय ज्या आगीत जळून भस्मसात झाल्या? त्या कधीच परत येणार नाहीत..’ या शब्दांत ऋषी कपूर यांनी त्यांचं दु:ख व्यक्त केलं होतं.