अभिनेता रितेश देशमुख लवकरच ‘बँक चोर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सध्या रितेशने एका वेगळ्या मार्गाचा अवलंब केला असून, यामध्ये त्याने काही प्रसिद्ध चित्रपटांच्या पोस्टर्सचा वापर केला आहे. मुख्य म्हणजे या पोस्टरला त्याने विनोदी टच देत मूळ कलाकारांचे चेहरे काढून त्याऐवजी स्वत:चा चेहरा लावला आहे. त्यासोबतच या रिक्रिएटेड पोस्टरमध्ये त्याने चित्रपटाच्या टॅगलाइनही बदलल्या आहेत.

सलमान खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘ट्युबलाइट’ या आगामी चित्रपटाच्या पोस्टरवर रितेशने स्वत:चा चेहरा लावत त्यावर ‘इनकी ट्युबलाइट तो कभी नहीं जलेगी’, असं म्हटलं आहे. तर, आमिर खान स्टारर ‘दंगल’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये परफेक्शनिस्ट आमिर खान आणि त्याच्या ऑनस्क्रीन मुलींऐवजी रितेश देशमुख, विवेक ऑबेरॉय आणि या चित्रपटातील अभिनेत्रीचा फोटो दिसत आहे.

रितेश देशमुखच्या या अफलातून चित्रपटासाठी त्याने ‘लाइफ ऑफ पाय’ या चित्रपटाच्या पोस्टरचीही चोरी करत त्यामध्ये अभिनेता टायगर श्रॉफचा फोटो लावला आहे. या पोस्टरवर त्याने लिहिलंय, ‘आमच्याकडे खरा ‘टायगर’ नसल्यामुळे आमचा मित्र ‘टायगर’ त्या पोस्टरचा भाग होण्यासाठी तयार झाला.’ असं त्याने म्हटलंय. ‘बँक चोर’च्या प्रसिद्धीसाठी अवलंबलेला हा मार्ग सध्या चित्रपट वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी कलात्मकतेची पुढची पायरी गाठत रितेशची ही हटके कल्पना सध्या अनेकांचीच दाद मिळवत आहे.

https://www.instagram.com/p/BUYn3a-h5uA/

https://www.instagram.com/p/BUYsuYchz50/

https://www.instagram.com/p/BUZRi4DBNRF/

विनोदी भूमिकांसाठी ओळखला जाणारा रितेश या चित्रपटातून आपल्या दोन सहकऱ्यांसोबत ‘बँक चोर’ बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटात तो ‘चंपक चंद्रगुप्त चिपळूणकर’ ही भूमिका साकारणार आहे. बंपी दिग्दर्शित ‘बँक चोर’ चित्रपटाची निर्मिती यश राज बॅनरचे यूथ प्रॉडक्शन हाऊस ‘व्हाय- फिल्म्स’ने केली आहे. ‘व्हाय- फिल्म्स’ने या आधी ‘मॅन्स वर्ल्ड’, ‘बँड बाजा बारात’ आणि ‘लेडीज रूम’ यांसारख्या वेब सीरिजची निर्मिती केली होती.