जवळपास तीन दशकांपेक्षा जास्त काळ चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता संजय दत्त सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. येत्या काळात संजूबाबाची बरीच रुपं प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत ‘चॉकलेट बॉय’च्या चौकटीतून बाहेर पडत राकट आणि तापट स्वभावाच्या भूमिका त्याने प्रभावीपणे साकारल्या.

‘वास्तव’, ‘खलनायक’, ‘अग्निपथ’, ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटांमध्ये संजूबाबाने साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. याच चित्रपटांच्या रांगेतील आणखी एक नाव म्हणजे ‘काँटे’. संजय दत्तने नुकतंच त्याच्या आगामी चित्रपटातील नव्या लूकचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याची हेअरस्टाइल पाहता ‘काँटे’मधील संजय दत्तचीच आठवण होतेय.
‘साहेब बिवी और गँगस्टर’ या चित्रपटासाठी त्याचा हा नवा लूक असल्याचं कळतंय. ‘साहेब, बिवी और गँगस्टरसाठीच्या या नव्या लूकबद्दल मी तुझा आभारी आहे शारिक’, असं कॅप्शन देत संजयने हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये चेहऱ्याची एकच बाजू दिसत असून, त्याची हेइरस्टाइल ‘काँटे’मधील भूमिकेशी अगदी मिळतीजुळती आहे. त्यामळे आता या चित्रपटातील त्याची भूमिका नेमकी कशी असणार, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.

तिग्मांशु धुलिया दिग्दर्शित ‘साहेब बिवी और गँगस्टर’ या चित्रपटाच्या सीरीजमधील हा तिसरा चित्रपट असून याआधी २०११ आणि २०१३ मध्ये या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले होते. ऑगस्ट महिन्यात ‘साहेब, बिवी…’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुजरातच्या पूर्व सीमेजवळील देवगढ बारिया या भागात चित्रीकरणासाठीच्या ठिकाणांची निश्चिती करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. या चित्रपटापूर्वी संजय दत्त ‘भूमी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामध्ये अदिती राव हैदरीसोबत तो स्क्रीन शेअर करत असून, २२ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.