निर्माता- दिग्दर्शक करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या हे दोघंही आपल्या करिअरमध्ये स्थिरस्थावर होऊ बघत आहेत. या दोघांनीही स्वत:चा असा स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण केला आहे. करणच्या चित्रपटात स्क्रीन शेअर केल्यानंतर त्याची ही ‘स्टुडंट जोडी’ बऱ्याच कार्यक्रमांना एकत्र दिसू लागली. सिद्धार्थ-आलियाच्या सतत एकत्र असण्याने अनेकांनी ते रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाजही बांधला होता. पण, या दोघांनीही कधीच या वृत्ताला दुजोरा दिला नाही.

आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असं म्हणत या दोघांनीही माध्यमांच्या आणि छायाचित्रकारांच्या नजरा आपल्यापरीने चुकवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांची सो कॉल्ड मैत्री काही केल्या लपली नाही हेच खरं. प्रियांका चोप्राच्या मायदेशी परतण्याचा निमित्ताने आयोजित केलेली पार्टी म्हणा किंवा मग एकमेकांच्या घरी जाणं… सिद्धार्थ-आलियाला बऱ्याचदा एकत्र पाहिलं गेलं. आता तर असंही म्हटलं जातंय की, करण जोहरच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीमध्ये आलियाने सिद्धार्थच्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीचे कोणतेही फोटो करण जोहरने सोशल मीडियामध्ये व्हायरल होणार नाहीत याची काळजी घेतली आहे. त्यामुळे आता नेमकं या भेटीमागचं कारण काय? असाच प्रश्न आलिया- सिद्धार्थच्या चाहत्यांच्या मनात घर करत आहे.

https://www.instagram.com/p/BUJ6mMXFmSy/

दरम्यान, आलिया- सिडच्या नात्याविषयी विचारलं असता, ‘तीसुद्धा एक सर्वसामान्य मुलगीच आहे. इतरांप्रमाणेच मोकळा वेळ कसा आणि कोणासोबत व्यतीत करावा हा सर्वस्वी तिचाच निर्णय आहे’, असं आलियाची आई म्हणाली होती. एकीकडे तिच्या आईचं हे वक्तव्य आणि दुसरीकडे सिद्धार्थच्या आई- वडीलांसोबतची तिची भेट हे सर्व समीकरण अनाकलनीय आहे असंच म्हणावं लागेल. आलिया- सिद्धार्थच्या नात्याला आता कोणतं वळण मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. या कलाकारांच्या सिक्रेट डेटिंगमध्ये निर्माता- दिग्दर्शक करण जोहरचीही महत्त्वाची भूमिका असल्याच्या चर्चा बी- टाऊनमध्ये रंगत आहेत. त्यामुळे करणवरही बऱ्याच नजरा खिळल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही.