बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेली अभिनेत्री सेलिना जेटली पुन्हा एकदा आई होणार आहे. सोशल मीडियावर सेलिनाची आई होण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली असून, चाहत्यांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या घडीला ती पाच वर्षांच्या जुळ्या मुलांची आई असून व्हिस्टन आणि विराज अशी तिच्या मुलांची नावं आहेत. पुन्हा गरोदर असण्याविषयी सांगताना, पुन्हा जुळी मुलं होणार असल्याचं कळताच आम्हाला धक्का बसला, असं ती म्हणाली.

‘डॉक्टर अल्ट्रासाऊंड करत असतानाच पीटरने त्यांना विचारलं की यावेळीसुद्धा जुळीच मुलं आहेत का? त्यावर डॉक्टर हो म्हणाले. ते ‘हो’ म्हणताच आम्हा दोघांनाही धक्काच बसला’, असं ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सेलिनाने सांगितले. ‘त्यावेळी आमच्या मनात आलेली पहिली गोष्ट अशी होती की, या मुलांच्या पालकत्वासाठी देवानेच आमची निवड केली आहे’, असंही सेलिना म्हणाली.

जुळ्या मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी पार पडताना त्यात काय आव्हानं येतात याचा सेलिना आणि तिचा पती पीटरला अंदाज असेलच, कारण त्यांना याआधीही जुळ्या मुलांच्या पालकत्वाचा अनुभव आहे. याच अनुभवाविषयी सांगताना ती म्हणाली, ‘सर्वोत्तम आई-वडील होण्यासाठी कोणताच मार्ग नाही असं माझी आई मला नेहमीच सांगत आलीये. पण, चांगले आई- वडील होण्यासाठी मात्र बरेच मार्ग आहेत.’ ऑक्टोबर महिन्यात सेलिना तिच्या बाळांना जन्म देणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या सेलिना भारतापासून दूर असली तरीही लवकरच एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी भारतात येणार आहे. याविषयी सांगताना ती म्हणाली, ‘मी पुन्हा कामावर रुजू झाले आहे. मी येत्या काळात एका जाहिरातीच्या निमित्ताने भारतात येणार असून, सध्याच्या घडीला मी एका पुस्तकावर काम करत आहे. हे पुस्तक पुढच्या वर्षी सर्वांच्या भेटीला येईल.’

celina-jaitly