हॉलिवूड चित्रपट निर्माता हार्वी विनस्टीन लैंगिक शोषण प्रकरण सध्या प्रचंड गाजत आहे. या सर्व प्रकरणात आता अभिनेत्री विद्या बालन हीने तिचं मत मांडलं आहे. हॉलिवूड मागोमाग बॉलिवूडमध्येही याविषयीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. हॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींनी या निर्मात्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केल्यानंतर या विषयाला हवा मिळाली होती. पाश्चात्य चित्रपटसृष्टीचा खरा चेहरा सर्वांसमोर उघड झाल्यानंतर सोशल मीडियावरही याविषयीच्या चर्चांनी जोर धरला.

चित्रपटांमध्ये महिला म्हणजे फक्त एक लक्षवेधी वस्तू म्हणून सादर न करता तिला स्वत:चं अस्तित्व असतं या विचारावर ठाम असणाऱ्या विद्याला हार्वी विनस्टीनविषयी तिचं मत विचारलं असता ती म्हणाली, “बऱ्याच वर्षांपासून हार्वी विनस्टीन अभिनेत्रींचं लैंगिक शोषण करतो आहे ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. त्यातही ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने या सर्व प्रकरणाला वाचा फोडेपर्यंत या धाडसी आणि कर्तृत्त्ववान महिलांपैकी कोणीही याची वाच्यता केली नाही, हे तर सर्वात जास्त धक्कादायक. तो हॉलिवूडमधील एक ख्यातनाम निर्माता आहे. पण, त्याने केलेल्या लैंगिक अत्याचारांची वाच्यता न करता इतकी वर्षे हा सर्व प्रकार उघड करणं एकाच गोष्टीकडे लक्ष वेधत आहे की, आयुष्यात कितीही यश संपादन केलं तरीही लैंगिक अत्याचारांविषयी उघडपणे बोलण्यास महिलांना आजही असुरक्षित वाटतं.”

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

विद्याच्या या वक्तव्यातून संताप, चीड या भावना व्यक्त होत होत्या. यावेळी तिने आपण कधीही अशा प्रसंगाचा सामना केला नाही, असंही स्पष्ट केलं. याविषयी सांगताना ती म्हणाली, ‘जर मला कोणाच्या असण्याने संकोचलेपणा वाटत असेल, त्यांचा उद्देश ठिक वाटत नसेल तर मी त्या व्यक्तीपासून आणि त्या संधीपासून दूर जाते. अशा गोष्टी हाताळण्याची ही माझी पद्धतच आहे. त्यामुळेच की काय, आजपर्यंत तरी माझ्यासमोर असा कोणताही प्रसंग आलेला नाही.’ विद्याने नेहमीच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तिचं मत ठामपणे मांडलं आहे. महिला सुरक्षितता, लैंगिक अत्याचार या मुद्द्यांवर ती बऱ्याच कार्यक्रमांमध्ये खुलेपणाने आपले विचार मांडत असते.