मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक प्रकरणी अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला. तिहेरी तलाकविषयी येत्या सहा महिन्यांत कायदा करावा तसेच हा कायदा होईपर्यंत सहा महिन्यांसाठी तिहेरी तलाकवर बंदी असेल असे या निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयाविषयीच्या प्रतिक्रिया सर्वच स्तरात उमटलेल्या पाहायला मिळाल्या. अनेक मुस्लिम महिलांसोबतच बॉलिवूड कलाकारांनीही या निर्णयाचं स्वागत केलं.

अभिनेत्री सलमा आगा, ऋषी कपूर, शबाना आझमी, अनुपम खेर, परेश रावल या कलाकार मंडळींनी तिहेरी तलाकच्या निर्णयाविषयी आनंद व्यक्त केला. ट्विटरच्या माध्यमातून या कलाकारांनी तिहेरी तलाकच्या विषयातील आपलं मत मांडलं.
‘तिहेरी तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं मी स्वागत करते. हा तर तिहेरी तलाकविरोधात लढा देणाऱ्या ४ धाडसी महिलांचा विजय आहे’, असं म्हणत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी ट्विट केलं. तर, ‘हा लोकशाहीचा विजय आहे’, असं म्हणत अभिनेत्री दिया मिर्झाने ट्विट केलं.

वाचा : मीना कुमारी यांच्याही नशिबात होता तिहेरी तलाक; वाचा त्यावेळी नेमकं काय घडलं

‘तिहेरी तलाक प्रकरणी घेण्यात आलेला हा निर्णय म्हणजे एक सुरुवात आहे’, असं चित्रपटसृष्टीतून राजकारणाकडे वळलेल्या परेश रावल यांनी आपल्या ट्विटद्वारे सांगितलं. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला. ‘येत्या काळात, मुस्लिम बांधवांच्या एका हातात संगणक आणि एका हातात कुराण दिसेल अशी आशा आहे’, असं ते म्हणाले.