न्यायालयात बोगस कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करत अभिनेता धनुषविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पालकत्वाच्या खटल्याप्रकरणी तमिळनाडूमधील एका जोडप्याने ही तक्रार दाखल केली आहे. धनुषने बोगस जन्माचा दाखला सादर केला असून, याविरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्या जोडप्याने केली. या जोडप्याने धनुष आमचाच मुलगा आहे, असे सांगत न्यायालयात धाव घेतली होती. धनुषने महिना ६५ हजार रुपयांचा भत्ता देण्याची मागणी या दाम्पत्यांनी केली होती. पण न्यायालयाने वृद्ध दाम्पत्यांचा दावा फेटाळत धनुषच्या बाजूने निकाल दिला होता.

मदुराई येथे राहणारे ६० वर्षीय आर. कथिरेसन आणि त्यांची ५५ वर्षीय पत्नी मीनाक्षी यांनी आपणच धनुषचे आई-वडील असल्याचा दावा केला होता. त्यांनी धनुषचे नाव कलाईसेल्वन ठेवले होते आणि मेलूर येथील एका शाळेत त्याचे नावही नोंदवले होते. कथिरेसन यांनी धनुषचा जन्मदाखला आणि लहानपणीचे फोटो पुरावा म्हणून न्यायालयाकडे सादर केले होते.

वाचा : बिग बींसोबतचा फोटो शेअर करत कादर खान यांना दिल्या शुभेच्छा, सोशल मीडियावर शत्रुघ्न सिन्हा ट्रोल

या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी न्यायालयाने धनुषच्या डीएनए टेस्टही करायला सांगितल्या होत्या. दाम्पत्याच्या मागणीवरुन न्यायालयाने धनुषला त्याच्या शरीरावर असलेल्या जन्मखुणा दाखवण्यास सांगितले होते. त्यानंतर धनुषने शरीरावर असलेल्या खुणांची चाचणीही केली होती.

वाचा : ‘मर्सल’च्या या दृश्यामुळे निर्माण झाला वाद

सिनेसृष्टीत येण्यापूर्वी त्याने आपले नाव धनुष के राजा असे ठेवले. धनुष अभिनेता झाल्यानंतर आम्हाला एकदाही भेटला नाही, असे कथिरेसन यांनी न्यायालयात म्हटले होते. न्यायालयाने त्या दाम्पत्याचे सर्व दावे फेटाळल्यामुळे धनुष प्रसिद्ध निर्माते कस्तुरी राजा आणि विजयलक्ष्मी यांचा मुलगा असल्याचे सिद्ध झाले होते.