‘डिअर जिंदगी’च्या पहिल्या पोस्टरमध्ये आलिया भट्ट एक हौतकरु छायाचित्रकार आणि शाहरुख एका मेंटॉरच्या भूमिकेत दिसत आहे. यात शाहरुख आलियाला आयुष्यात सतत पुढे जाण्याचा सल्ला देताना दिसत आहे. सोमवारी या सिनेमाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरसोबतच या सिनेमाचा ‘टेक २’ हा व्हिडिओही प्रदर्शित केला आहे. रेड चिली, शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांनी ट्विटरवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या टिझरमध्ये शाहरुख आलियाला तिच्या विनोदाचा स्तर उंचावण्याचा सल्ला तिला देताना दिसत आहे. या टिझरवरुन शाहरुख आणि आलियाने प्रेक्षकांच्या मनात या सिनेमासाठी स्थान बनवायला सुरुवात केली आहे.

या सिनेमाला प्रेक्षकांकडून एवढी पसंती मिळत आहे, याचं मुख्य कारण म्हणजे या सिनेमाची स्टारकास्ट. शाहरुखसोबत आलियाची हटके जोडी छान दिसत आहे. या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये जी उत्सुकता आहे त्याचं अजून एक कारण म्हणजे या सिनेमाची दिग्दर्शिका गौरी शिंदे. ‘इंग्लिश विंग्लिश’सारखा दमदार सिनेमा दिलेली गौरी आता वेगळ्या विषयासोबत प्रेक्षकांसमोर यायला सज्ज झाली आहे. या सिनेमात आलिया आणि शाहरुख रोमान्स करताना दिसणार नाहीएत तर त्यांची जोडी जरा हटके असणार आहे. या सिनेमाचा पहिला टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. या टिझरमध्ये शाहरुख आलियाला समुद्रासोबत कबड्डी खेळणं शिकवत आहे. यात दोघं सायकलस्वारी करतानाही दिसले. या सिनेमाचा एक नवीन पोस्टरही आज प्रदर्शित करण्यात आला आहे.

यात शाहरुखने स्मार्ट पेहराव केला आहे तर आलिया त्याला मोहक नजरेने पाहते आहे. या पोस्टरमध्ये शाहरुख नेहमी प्रमाणेच भाव खाऊन जात आहे. शाहरुख संपूर्ण सिनेमात थोड्या थोड्या वेळासाठी येताना दिसणार आहे. असे असले तरी त्याची महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे. या सिनेमात आलिया रोमान्स करताना जरी दिसणार नसली तरी तिच्यासाठी या सिनेमात चक्क चार हिरो घेण्यात आले आहेत. पण हे चार हिरो कोण आणि कशासाठी याचा खुलासा तरी अजून झालेला नाही.