‘बिग बॉस’चा अकरावा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहमीच वादविवाद आणि चर्चेत राहणाऱ्या या शोमध्ये काही सेलिब्रिटी आणि सामान्य व्यक्ती स्पर्धक म्हणून सहभागी होतात. यामध्ये ‘सोशल मीडिया सेन्सेशन’ ढिंच्याक पूजाचाही समावेश असल्याची माहिती गेल्या काही दिवसांत समोर आली होती. आपल्या बेसूर आवाजाने नेहमीच चर्चेत असणाऱ्या ढिंच्याक पूजाचे युट्यूब व्हिडिओ अनेक जणांकडून पाहिले जातात. आता याच पूजाला ‘बिग बॉस’मध्ये इतर स्पर्धकांपेक्षा जास्त मानधन मिळणार असल्याची माहिती समोर येतेय.

‘नवभारत टाइम्स’च्या माहितीनुसार ढिंच्याक पूजासोबत ‘बिग बॉस’शी संबंधित सर्व करार झालेले आहेत. तिचे युट्यूबवर व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या भारतात मोठ्या प्रमाणात आहे. ट्विटर आणि फेसबुकवरही तिच्या गाण्यांना खूप पसंती मिळते. या व्हिडिओंमुळे ती सध्या चांगली कमाई करतेच आहे. ‘क्वोरा’ या साईटने केलेल्या सर्व्हेनुसार तिचे उत्पन्न महिन्याला ३ ते ५० लाख इतके आहे. गुगलवरुन तिच्या गाण्यांना मिळणाऱ्या जाहिरातींवर ही गणिते अवलंबून असतात.

वाचा : अबब! कुत्र्यांवर सलमान करतो इतका खर्च

आता ‘बिग बॉस’ही तिला इतर स्पर्धकांपेक्षा जास्त मानधन देणार असल्याची चर्चा असल्याने ढिंच्याक पूजाला तिच्या प्रसिद्धीचा चांगलाच फायदा झाला असं म्हणायला हरकत नाही. ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याआधी ती काही नवीन व्हिडिओ शूट करणार असल्याचीही माहिती मिळतेय. त्यामुळे यंदा ‘बिग बॉस’च्या घरी ढिंच्याक पूजाची बेसूर आवाजातील गाणी इतर स्पर्धकांना तसेच प्रेक्षकांना ऐकायला मिळणार हे नक्की. मात्र ही गाणी स्पर्धक आणि प्रेक्षक झेलू शकतील की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.