चित्रपट, नाटक, मालिका, कादंबरी, कथा अशा कोणत्याही कलाकृतीला रूढार्थाने कथानक असते. या कथानकाला नायक असतो, नायिका असते, खलनायक असतो आणि त्यांची गोष्ट असते. यात मनोरंजन आणि मानवी वृत्तींची मसालेदार फोडणी मिळाली की वरीलपैकी कोणतीही एक यशस्वी कलाकृती साकारू शकते. या माध्यमांसाठी हे सूत्र तसे नवे नाही. मागील वर्षीचे यशस्वी चित्रपट काढले तरी ‘दंगल’, ‘सुलतान’, ‘अझर’, ‘धोनी : अनटोल्ड स्टोरी’ या बॉक्स ऑफिसवर तुफानी गर्दी खेचणाऱ्या क्रीडाविषयक चित्रपटांनीही हेच सूत्र जपले. थोडे मागे गेल्यास अगदी ‘भाग मिल्खा भाग’चेही उदाहरण देता येऊ शकते. मात्र ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट हे सूत्र नाकारून सचिन जस्सा आहे, तस्साच्या तसा प्रामाणिकपणे प्रकट होतो. त्यामुळेच हा चरित्रपट माहितीपटाचे रूप धारण करतो. अर्थात त्याचे नायकत्व सचिनकडेच असते. सूत्रधाराची भूमिका घेत तो आपला अब्जावधी क्रिकेटरसिकांचे स्वप्न साध्य करण्याचा प्रवास मांडतो.

दस्तुरखुद्द सचिन, त्याची पत्नी अंजली, आई रजनी, वडील रमेश, भाऊ अजित व नितीन, बहीण, मुलगी सारा, मुलगा अर्जुन तसेच मित्रपरिवार, सहक्रिकेटपटू, जाणकार हे घडामोडीच्या प्रसंगातील आपले मत प्रकट करीत या माहितीपटाला अधिक सशक्त बनवतात. सचिन अभिजात आहे, सचिन सर्वज्ञात आहे. त्याची ओळख चित्रपटातून आणखी काय वेगळी करायची? हा मुद्दा जीवनपट पाहण्याआधीपर्यंत कुणालाही पडणे स्वाभाविक होते. पण यात सचिनने दावा केल्याप्रमाणे अनेक प्रसंगांच्या ध्वनिचित्रफिती वापरून त्या घटना वास्तववादी ठेवण्यात आल्या आहेत. अगदी साराच्या जन्मापासून ते गॅरी कर्स्र्टन यांनी २०११ मध्ये पाकिस्तानविरुद्धची उपांत्य फेरी जिंकल्यानंतर भारतीय संघाला दिलेल्या सल्ल्यापर्यंत, कधी देवावरील श्रद्धा, तर कधी मित्रमंडळींसोबतचे रम्य क्षण अशा बऱ्याच ध्वनिचित्रफिती खासगीतला सचिन कसा आहे, हे उलगडतात.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: SRH चे फलंदाज ठरले फेल पण २० वर्षाच्या तरुणतुर्क शिलेदाराने सावरला संघाचा डाव, कोण आहे हा नितीश रेड्डी?

सचिनच्या २४ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत असे अनेक कसोटीचे क्षण आले. ते प्रसंग जेव्हा घडत होते तेव्हा संपूर्णत: सचिनने कधीच आपले मत प्रकट केले नव्हते. कर्णधारपदावरून हकालपट्टी आणि मग पुन्हा नियुक्ती, १९९९ मध्ये घोंगावलेले मॅच-फिक्सिंगचे वादळ, २००७ मध्ये कॅरेबियन बेटांवर गेलेल्या भारतीय संघाची मन:स्थिती, ग्रेग चॅपेल यांची ‘फोडा आणि राज्य करा’ रणनीती, कारकीर्दीच्या अपयशी टप्प्यावरची मन:स्थिती हे सारे नाटय़मय प्रसंग आतापर्यंत या विषयांवर अव्यक्त असलेल्या सचिनला बोलकं करतात. या प्रत्येक घटनेच्यावेळी आपली मन:स्थिती नेमकी काय होती, आपली मतं काय आहेत हे पहिल्यांदाच त्याने जाहीरपणे या चरित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य चाहत्यांनाही त्या प्रसंगांचे महत्त्व कळायला मदत झाली आहे.

सचिनवरील चरित्रपटाच्या मध्यंतराने विभागलेल्या दोन डावांचे विश्लेषण केल्यास पहिल्या भागात काही ठिकाणी फिल्मी नाटय़ाचासुद्धा चपखल वापर करण्यात आला आहे. दुसऱ्या डावात मात्र हा चरित्रपट माहितीपट अधिक होऊन जातो आणि ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ म्हणजेच जगज्जेते होण्यापर्यंतचा प्रवास उलगडतो. अगदी तिथेच न थांबता वानखेडेवरील अखेरचा सामना आणि निवृत्तीपर्यंत म्हणजेच सचिन अथपासून इतिपर्यंत पूर्णपणे मांडला जातो. मध्यंतरापर्यंत नटखट सचिन आणि त्याच्या साहित्य सहवासमधील बाललीला तसेच अजितच्या दिशादर्शनानंतर सचिनचे रमाकांत आचरेकर सरांकडून क्रिकेटविद्या शिकणे या प्रसंगांना अधिक जिवंतता येते. बालमित्राला खड्डय़ात पाडण्यासाठी रचलेला सापळा, सोसायटीतील रहिवाशांच्या गाडय़ांचे पंक्चर केलेले टायर किंवा जेवणाच्या डब्यातून आणलेला बेडूक असे प्रसंग यामुळे आता शांत वाटणारा सचिन लहानपणी इतका खोडकर होता, यावर चटकन विश्वास बसत नाही. अगदी सुरुवातीच्या फ्रेममध्ये नुकत्याच जन्मलेल्या साराला हातात घेताना ‘मला अतिशय भीती वाटते’ म्हणणारा सचिनही आपल्याला नवाच असतो. तो जसा आहे तसा दिसणे, जाणवणे हे या चरित्रपटाचे यश आहे जे इतर खेळाडूंवर आलेल्या चरित्रपटांपेक्षा वेगळे ठरते.

‘भाग मिल्खा भाग’, ‘धोनी’, ‘अझर’ आदी चित्रपटांमध्ये त्या चरित्रनायकांचे प्रेमजीवनही त्याला हिरो म्हणून साकारणारे अतिशय रोमँटिक पद्धतीने रंगवण्यात आले होते. त्यामुळे त्यातला वास्तवाचा स्पर्श कमी होतो. सचिन आणि अंजलीची प्रेमकहाणीसुद्धा मुळात रोमँटिक आहे. पण इथे त्या दोघांनी स्वत:च ती सांगितली आहे किंबहुना, तीन-चार वर्षांच्या प्रेमानंतर जेव्हा विवाहाचा निर्णय घरी सांगण्याची वेळ आली तेव्हा सचिनने अंजलीला हे तुलाच करावे लागेल, असे म्हणत तिच्यावरच ही जबाबदारी कशी टाकली याचे गमतीशीर वर्णन अंजलीने केले आहे. अर्थात या दोघांची ही प्रेमकथा नाटय़मय रूपात पाहायला मिळाली असती तर ती अधिक आवडली असती यात शंका नाही. जेव्हा एखाद्याचे आयुष्य राष्ट्रीय संपत्ती होते तेव्हा त्याच्या जोडीदाराला मात्र आपल्या कारकीर्दीचे बलिदान द्यावे लागते. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अंजलीने सचिनच्या प्रवासातील ही भूमिका चोख बजावली. कौटुंबिक किंवा कारकीर्दीतील महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये ती त्याच्या पाठीशी राहिली. त्याला धीर दिला. त्याला कोणत्याही प्रसंगाची झळ पोहोचू दिली नाही, हेही सर्वज्ञात आहे. पण पत्नी म्हणून आपल्या जोडीदाराने आपल्यावर भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू म्हणून किती ताण आहे हे समजून घेणे ही आपली गरज होती, असे सचिन सांगतो तेव्हा अंजलीची त्याच्या आयुष्यातील भूमिका किती चोख होती हे जास्त लक्षात येते.

यशाच्या वेळी डोक्यावर घेणारे क्रिकेटचाहते अपयशाप्रसंगी कोणत्या थराला जाऊ शकतात, याचे वास्तव रूपसुद्धा इथे प्रकट होते. १९९६ मध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर श्रीलंकेविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना भारत गमावणार, हे स्पष्ट झाल्यावर बिथरलेल्या क्रिकेटचाहत्यांनी जाळपोळ, फेकाफेक करीत सामना थांबवण्यापर्यंत हिंमत केली होती. त्यानंतर २००७च्या विश्वचषकात भारताचे आव्हान साखळीतच संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघाविरोधातील लाट प्रक्षुब्ध झाली होती. भारतीय क्रिकेटपटूंच्या प्रतिमांचे दहन, काही खेळाडूंच्या घरांवर हल्ले हे क्षणसुद्धा यात आवर्जून नमूद करण्यात आले आहेत. त्या वेळी अर्जुनला शाळकरी सहविद्यार्थ्यांने तुझे वडील वाईट खेळले, म्हणून आपण हरलो, असे खडे बोल सुनावले होते. त्या वेळी अर्जुन त्याच्या उरावर बसला होता. पुन्हा बोलला तर याद राख, असा इशारासुद्धा दिला. हे प्रसंग मांडताना सचिन हळवा होतो. परंतु एखाद्याच्या मोठेपणाची किंमत त्याच्या कुटुंबीयांना कशा प्रकारे सहन करावी लागते, हे आपल्या भाष्यातून सचिनने सहजपणे अधोरेखित केले आहे.

भारताच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीपासून सुरू होणारी ही माहितीगाथा टीव्हीचा उदय, १९८३ मध्ये भारताने जगज्जेतेपद मिळवल्यानंतर देशात निर्माण झालेले क्रिकेटमय वातावरण, दूरदर्शनला बाजूला सारत खासगी क्रीडावाहिन्यांचे क्रांतिकारक पाऊल, आयपीएलच्या यशातील सचिनची भूमिका या घटना सचिनप्रवासात मुळीच परक्या वाटत नाहीत. त्यांच्याशी जोडण्याचे कार्य दिग्दर्शकाने अधिक उत्तमतेने प्रेक्षकांची मानसिकता समजून केले आहे. यातील भारत-पाकिस्तान सामने आणि सचिन हा धागा जोडताना तर या दोन देशांचे तुकडे झाल्यापासूनच्या इतिहासापासूनच सुरुवात होते. मग पहिल्यावहिल्या पाकिस्तान दौऱ्यात तेथील तेजतर्रार गोलंदाजांना षोड्शवर्षीय सचिन काय करामत करणार, याविषयी कुतूहल होते. त्यानंतर जगद्विख्यात फिरकी गोलंदाज अब्दुल कादिरवर केलेले आक्रमण इथपासून ते २०११च्या विश्वचषक उपांत्य सामन्यापर्यंत सचिनच्या कारकीर्दीतील पाकिस्तानविरुद्धचे नायकत्व अतिशय प्रभावीपणे अवतरते. ते प्रकट होताना त्या सामन्यांचे वास्तवातील प्रसंग त्यांना नाटय़रूप जरी देऊ शकले नसले तरी जिवंत नक्की करतात. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढवय्येगिरी, जगातील सर्वोत्तम फिरकीपटू शेन वॉर्नची गोलंदाजी समजून घेत त्याची लय बिघडवण्याची केलेली किमया. त्यासाठीचा अभ्यासात्मक दृष्टिकोन रोचक आहे.

सचिनचे घर म्हणजे साहित्यिक रमेश तेंडुलकर यांचे कुटुंब. त्यामुळे घरातील मराठीपण या जीवनपटात बऱ्याच ठिकाणी कायम ठेवले आहे. वडिलांची साहित्यिक गोडी, मुलांशी संवाद, साहित्य सहवासमधील दिवस अशा अनेक प्रसंगांतून हे मराठीपण दिसते. सचिनकडे ज्या वेळी बऱ्याच जाहिराती चालून आल्या, तेव्हा सचिन पैशासाठी खेळतो, अशी त्याच्यावर टीकाही झाली होती. या जीवनपटाच्या माध्यमातून पैसा हा सर्वानाच हवा असतो, पण क्रिकेटसाठी कधीच मी तडजोड केली नाही, असे तो प्रामाणिकपणे सांगतो.

भारतात क्रिकेट हा धर्म आणि सचिन म्हणजे देव, असे मानले जाते. त्याचे हे देवत्व धर्म आणि भाषा यांच्यामुळे कधीच सीमित राहिले नाही. हे मांडताना सचिनच्या महत्त्वाच्या खेळीच्या वेळी मंदिर, मशीद, चर्च आदी ठिकाणी केली जाणारी प्रार्थना दाखवण्यात आली आहे. एकंदरीत क्रिकेटवर आणि सचिनवर प्रेम करणाऱ्यांसाठी त्याचा हा प्रवास पडद्यावर पाहताना भावनिकदृष्टय़ा तो आपलाच आहे, असं वाटून तो त्यांच्याशी जोडला जातो हेच त्याचे यश आहे.