एकदा का चेहऱ्याला रंग लागला की तो कायमचाच, असं म्हटलं जातं. नाटकाचं वेड असणाऱ्यांच्या बाबतीतही हे काहीसं बरोबरच आहे. एकदा का रंगभूमीशी संबंध आला की तिच्यापासून दूर राहणं कठीणच. मग ती एकांकिका असो प्रायोगिक नाटक असो किंवा व्यावसायिक. सतत काही तरी नवा प्रयत्न करुन पाहूया अशी उर्मी प्रत्येकाच्या मनात असते. प्रत्येक नाटक आणि नाटकाचा प्रत्येक प्रयोग खूप काही शिकवणारा असतो. आपल्या याच नाटकाच्या प्रेमाबद्दल सांगतेय अभिनेत्री पूजा ठोंबरे..

‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका करताना आम्ही सगळ्यांनाच मजा येत होती. पण प्रत्येकाला आपण मिळून एखादं नाटक करायला हवं असं सारखं वाटत होतं. कारण आम्हा सगळ्यांचीच नाटक ही पार्श्वभूमी आहे. साधारणपणे आधी संहिता लिहिली जाते मग कलाकार कोण घ्यायचे हे ठरतं. पण आमच्याबाबतीत आम्ही आधी एकत्र नाटक करायचं ठरवलं. मग नाटकाचा विषय काय हवा त्यासाठी लेखक वैगेरे अशा इतर गोष्टी जुळवून आणल्या. नाटकाची बांधणी करण्यापासून ते नाटकाचा प्रयोग करेपर्यंत सगळ्याच गोष्टी जवळून पाहिल्याने हे ‘अमर फोटो स्टुडिओ’ नाटक माझ्या फार जवळच आहे.

‘दिल दोस्ती दुनियादारी’मुळे अॅना घराघरात पोहोचली. पण या नाटकातल्या माझ्या भूमिका या खूप वेगळ्या आहेत. यात अॅना कुठेच दिसत नाही. प्रेक्षकांना हीच बाब जास्त आवडतही आहे. प्रत्येक प्रयोग हा मला नवीन काही शिकवून जातो हेही मी या नाटकामुळे शिकले. प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षक वेगळे, त्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्या असतात. त्यामुळे ते क्षणच तुम्हाला शिकवत असतात वेगळे बसून काही धडे घ्यायची गरज नसते असं मला वाटतं.

माझ्यासाठी नाटक हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे.  माझं १२ वी पर्यंतच शिक्षण बीडमध्ये झालं. त्यानंतर मी ललीत कला केंद्रामध्ये नाटकाचं शिक्षण घेतलं. त्यामुळे नाटक हा माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा विषय आहे. असं असलं तरी सिनेमा, मालिका याची प्रत्येकाची अशी वेगळी ओळख आहे, त्यात काम करण्याची एक वेगळी मजा आहे. पण नाटकात तुम्हाला तुमच्या कामाची पोचपावती लगेच मिळते. तुम्ही चुकलात तरी शिकता आणि तुम्ही चांगले काम केले तरी शाबासकीची थापही तिथेच मिळते. त्यामुळे नाटकाच्या प्रयोगाचे ते काही तास मी अक्षरशः जगते. जोवर कला क्षेत्रात आहे तोवर नाटकात काम करायला मला नेहमीच आवडेल.

शब्दांकन- मधुरा नेरुरकर

madhura.nerurkar@indianexpress.com