घराणेशाहीच्या वादानंतर इंटनेटवर कोणत्या विषयावर चर्चा रंगली असले तर तो होता फेअरनेस क्रिमच्या जाहीरांतीवरील वाद. अभिनेता अभय देओलने फेअरनेस क्रिमच्या जाहिराती करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांना फेसबुकवरून फटकारले होते. यावर नुकतीच प्रियांका चोप्राने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियांका म्हणाली की, ‘खूप वर्षांपूर्वी मी जवळपास १२ महिन्यांकरिता फेअरनेस क्रिमची जाहिरात केली होती. पण, ज्याप्रमाणे मी विचार केलेला तसं ते प्रॉडक्ट नव्हतं. त्यानंतर मी कधीच फेअरनेस क्रिमची जाहिरात केली नाही.’ याआधी अभय आणि सोनम कपूरमध्ये या वादावरून सोशल मिडीयावर शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. अभयच्या पोस्टवर प्रत्युत्तर देत सोनम म्हणालेली की, ‘ही जाहिरात मी १० वर्षांपूर्वी केली होती. तेव्हा मला याचे परिणाम माहित नव्हते. हे सगळ्यांसमोर आणण्यासाठी तुझे आभार.’ यासोबतच सोनमने आणखी एक ट्विट केले होते. त्यात तिने अभयची चुलत बहिण ईशा देओलने केलेल्या जाहिरातीचा फोटो जोडला होता आणि त्यावर त्याचे मत विचारले होते. याला उत्तर देताना अभयने लिहिलेलं की, ‘हे ही चुकीचेच आहे. माझं मत जाणून घेण्यासाठी माझी पोस्ट वाच. सोनम तू अधिक प्रतिभाशाली हो आणि तुला मिळालेल्या ताकदीचा योग्य वापर कर.’

त्वचा उजळ करून देण्याचा दावा करणाऱ्या म्हणजेच पर्यायाने रंगभेदाला खतपाणी घालणाऱ्या क्रिम, लोशन्सविरुद्ध अभय देओलने काही दिवसांपूर्वी एल्गार पुकारला होता. फेअरनेस क्रिमच्या जाहिरातींमध्ये काम करणारे बॉलिवूड कलाकार त्याच्या रडारवर होते. किंग खानपासून दीपिका पदुकोणपर्यंत सगळ्यांनाच त्याने धारेवर धरलं होतं. निसर्गाने दिलेला कोणताही रंग चांगलाच असतो. प्रगती करायची असेल तर गोरंच असायला हवं हा अट्टहास का असा त्याने सवाल केला होता. बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्रींना प्रचंड फॅनफॉलोइंग आहे. त्यांनी सांगितलं तर चाहते वेगळा मार्गही पत्करू शकतात. परंतु सगळेच भेदभाव वाढवत आहेत असा आरोपही त्याने केला होता. फेसबुकवर एक भलीमोठी पोस्ट करत माझं कोणाविरुद्धही वैयक्तिक शत्रुत्व नसल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं. या पोस्टसह त्याने जाहिरातींचे स्क्रिनशॉटदेखील शेअर केले होते.

अभयने केवळ जाहिराती करणाऱ्या कलाकारांचा विरोध केला असं नाही. तर फेअरनेस क्रिमच्या जाहिराती न करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेणाऱ्या रणबीर कपूर, कंगना राणावत या दोघांचेही त्याने कौतुक केले.