बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर आणि सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अधुना अख्तर यांचा सोमवारी घटस्फोट झाला. १६ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर या दोघांनी सामंजस्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये समुपदेशन केल्यानंतर त्यांना घटस्फोटाचा अर्ज मागे घेऊन एकत्र राहायचेय की नाही हे ठरवण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. मात्र, सहा महिन्यांनंतरही हे दोघे त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले.

अधुना आणि फरहान या दोघांचीही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मान्य केला. शाक्या आणि अकिरा या त्यांच्या दोन मुलींची जबाबदारी अधुनाकडे देण्यात आली असून, फरहानला त्यांना केव्हाही भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर फरहान आणि अधुनाने २००० साली लग्न केले होते. मात्र, फरहान आणि अधुनाच्या १६ वर्षांच्या संसारात वादाची ठिणगी नेमकी कोणत्या कारणामुळे पडली यामागचे मूळ कारण आजतागायत समोर आलेले नाही. या दोघांनी सामंजस्याने घटस्फोट घेतल्यामुळे त्यानंतरही त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध राहणार आहेत. फेब्रुवारीमध्ये त्यांच्या मुलीचा म्हणजेच अकिराचा वाढदिवस झाला. त्यावेळीही हे दोघेजण एकत्र आले होते.

काही संकेतस्थळांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार फरहानची ‘वझीर’ फेम सहकलाकार आदिती राव हैदरी हिच्यासोबत जवळीक वाढली होती, त्यामुळेच त्याच्या आणि अधुनाच्या नात्यात दुरावा आल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबतही फरहानचे नाव जोडले गेलेले. पण, त्यांनाही चर्चांचेच नाव देण्यात आले होते.