बॉलिवू़डमध्ये प्रेमकथांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या करणने रोमान्ससाठी तंत्रज्ञान घातक असल्याचे म्हटले आहे. रोमान्सचा बेरंग केल्यानंतर तंत्रज्ञानाने आता संवादावर देखील घाला घातला असल्याचे त्याने सांगितले. तंत्रज्ञानामुळे रोमान्स आणि सवांद कमी होत असल्याचे सांगताना करणने मोबाईल लोकांचे मोठे व्यसन बनत असल्याचे देखील बोलून दाखविले. तंत्रज्ञान आणि रोमान्स यासंदर्भात करण म्हणाला की, “सध्याच्या घडीला मोबाईल शरीराचा अविभाज्य घटक झाल्याचे पाहायला मिळते आहे. आज मला लोक एकमेकांसोबत बोलताना दिसत नाहीत. परिवारामध्ये देखील संवाद कमी होताना दिसतोय. पहिल्यांदा तंत्रज्ञानाने रोमान्सचा बळी घेतला. त्यानंतर आता तंत्रज्ञानामुळे संवाद संपला.

तंत्रज्ञानामुळे संवादामध्ये झालेला बदलाविषयी बोलताना करणने जुन्या पिढीतील अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकारांच्या नावाचे दाखला दिला. करण म्हणाला की, “मी बॉलिवू़ड वर्तुळात दिग्गजांसोबत वावरलो आहे. मी चित्रीकरणाच्या सेटवर राज कपूर यांना पाहिलंय. यश चोप्रा यांना दिग्दर्शन करताना पाहिलंय. तर संगीत क्षेत्रातील दिग्गज लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याशीही माझा संपर्क आला होता. या पिढीमध्ये संवाद साधण्याची आणि एकमेकांसोबत कामाचा अनुभव शेअर करण्याची वृत्ती होती.”
अर्थात करणने जरी तंत्रज्ञानावर परस्परातील संवाद संपविण्याचा आरोप केला असला तरी याच तंत्रज्ञानामुळे करणच्या आयुष्यात आनंदी क्षण आणले आहेत. काही दिवसांपूर्वी करणने सरोगसीद्वारे दोन जुळ्या मुलांचे पालकत्व स्वीकारले होते. मुलांच्या जन्माची घोषणा करत त्याने यश आणि रुही माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे करण जरी तंत्रज्ञान रोमान्स आणि संवादाला घातक असल्याचे सांगत असला तरी याच तंत्रज्ञानाने करणच्या आयुष्यात आनंदी क्षण आले आहेत, हे देखील तितकेच खरे आहे.

करणच्या बॉलिवूडमधील यशाविषयी बोलायचे तर ‘ये दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या यशानंतर सध्या त्याच्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्याचे दिसते. याशिवाय करणच्या धर्मा प्रोडक्शनने आगामी ‘बाहुबली २’ या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे हक्क विकत घेतले आहेत. या चित्रपटाकडून त्याला चांगल्या कमाईची अपेक्षा असेल.