चित्रपटाचा मुहूर्त म्हणजे एखाद्या स्टुडिओत खूपच मोठा भव्य सेट आणि त्यावर नायक नायिकेला जरा जास्तच महत्त्व मिळेल असे दृश्य हे समीकरण अनेक वर्षे तरी पक्के झालेले . पण त्याला एकादा मुहूर्त अपवाद ठरतो म्हणूनच तर लक्षात राहतो. ‘हुकुमत’ (१९८७) चा मुहूर्त अगदी तसाच ठरला. खरं तर दिग्दर्शक अनिल शर्मा आणि धर्मेंद्र या सुपर हिट जोडीचा हा चित्रपट म्हणजे ‘कुत्ते कमिने मै तुझे जिंदा नही छोड़ूंगा|’ असाच धर्मेन्द्रचा ‘ही मॅन’ रुपातील जोरदार संवाद हवाच ना? मुहूर्त क्षणी खुद्द धर्मेंद्र हजर असल्याचे दिसल्यावर तर त्याच्यावरच मुहूर्त दृश्य चित्रीत होणार हे तर अगदीच स्पष्ट होते. प्रत्यक्षात काय पाह्यला मिळाले?

वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमधील प्रशस्त हॉलमध्ये सकाळीच अकरा वाजता हा मुहूर्त होता. पारंपरिक फिल्मी रिवाजानुसार तासभर उशीर झाला तरी त्याचे फारसे कोणाला काहीच गैर वाटत नव्हते. आणि जेव्हा अनिल शर्मा म्हणाला चलो ‘शॉट रेडी है…’ तेव्हा सगळ्यांनीच धर्मेन्द्रकडे पाहणे स्वाभाविक होते. पण झाले भलतेच. कॅमेर्‍यासमोर सदाशिव अमरापूरकर व एक कुत्रा मुहूर्त दृश्यासाठी सज्ज दिसले. अमरापूरकर चाबूक चालवत त्या कुत्र्याला कडक शब्दांत काही गोष्टी समजवतात असे नाट्यमय दृश्य चित्रीत झाले. चित्रपटातील खलनायकावर चित्रपटाचा मुहूर्त हेच वेगळेपण होते. स्वतः अमरापूरकरही विशेष खुश दिसले. दृश्य संपताच धर्मेंद्रने अमरापूरकरना छान मिठी मारून अभिनंदन केले. आजूबाजूची गर्दी ओसरताच अमरापूरकरना भेटताच त्यांनी मला सांगितले, एक दोन दिवसापूर्वीच अनिल शर्मा मला म्हणाला, यार ‘हुकुमत’ का महुरत कुछ अलग तरह से करते है| लोग याद रखेंगे…| पण तेव्हा असे काही दृश्य असेल असे मला वाटले नव्हते. व्हीलनला एकट्यालाच मुहूर्त दृश्यात संधी देत त्याने वेगळाच पायंडा पाडलाय. मी तर खुप खुश आहे. दीनबंधु दीनानाथ ही व्यक्तिरेखा यात मी साकारतोय. तो शांती नगर नावाची गरिबांची एक वस्ती हटविण्यासाठी कसे दुष्ट प्रयत्न करतो अशी माझी व्यक्तिरेखा आहे.

असो. त्या दिवसात ‘हुकुमत’च्या या मुहूर्ताची बरीच चर्चा रंगली. थोड्याच दिवसात या चित्रपटातील इतर कलाकार निवडले गेले. रति अग्निहोत्री धर्मेंद्रची नायिका तर इतर भूमिकांत शम्मी कपूर, जुगल हंसराज, जोगिंदर, स्वप्ना, प्रेम चोप्रा यांची निवड झाली. धर्मेंद्र व सदाशिव अमरापूरकर या दोघांची या चित्रपटात खुन्नस पाह्यला मिळाली तरी प्रत्यक्षात त्यांची जोडी छानच जमली. ‘हुकुमत’च्या यशापासून दोघांनाही खूप ऑफर आल्या. धर्मेंद्रच्या कारकिर्दीत ‘फूल और पत्थर’ (१९६७) व ‘हुकुमत’ या दोन चित्रपटांच्या यशाने त्याच्या कारकिर्दीला उभारी आली.
दिलीप ठाकूर