मसक्कलीची मैत्रीण सुश्मिता ग्लॅमजगतापासून दूर गेली असली तरी तिच्या सामाजिक जाणिवेमुळे सतत चर्चेत असते. मिस युनिव्हर्स स्पर्धेत तिची परीक्षक म्हणून निवडण्यात आल्याची बातमी जुनी झाली असली तरी आता तिच्याबद्दल एक नवी बातमी हाती आली आहे. ती लवकरच जंगली प्राण्यांच्या संवर्धनासाठी तयार करण्यात येणाऱ्या लघुपटात अभिनय करणार आहे. ‘आय अ‍ॅम द फॉरेस्ट’ असे या लघुपटाचे नाव आहे. तिच्या या सामाजिक जाणिवेमुळे तिचे चाहते तिच्यावर जास्त खूश होतील यात शंका नाही.

‘कौन बनेगा..’ नवा सूत्रसंचालक?

आज मसक्कलीने तुम्हाला धक्का देणारी बातमी आणली आहे. तुम्हा सर्वाचे लाडके ‘होस्ट’ तुम्हाला लवकरच अलविदा करणार आहेत. एकेकाळी त्यांनी आपल्या सूत्रसंचालनाने टीव्हीवरील कार्यक्रमांना एक वेगळा आयाम दिला होता. त्यांचा आवाज ऐकल्यावर भल्याभल्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. मात्र त्यांची जागा आता नवीन होस्ट घेणार आहे. आपले आवडते बिग बी ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातून एक्झिट घेणार असून त्यांची जागा बर्फीबॉय रणबीर कपूर घेणार आहे. मला ही बातमी समजताच मलाही या धक्क्यातून सावरायला वेळ लागला म्हणा. तुम्हा प्रेक्षकांनाही बिग बींच्या जागी रणबीरला स्वीकारणे कदाचित कठीण जाईल. पण रणबीर हे किती सहजपणे शक्य करतो हे येणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या नव्या सीझनमध्येच समजेल.

-मसक्कली