भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेट संघांदरम्यान कटक येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यामध्ये ड्रामा, खेळ, भावनांचा कल्लोळ आणि चाहत्यांचा कल्ला हे सारे घटक पाहायला मिळाले. भारताने इंग्लंडच्या संघावर मात करत हा सामना आणि मालिका खिशात टाकली. कटक येथे झालेल्या या धम्माल क्रिकेट सामन्यामध्ये मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे युवराज सिंग. युवराजने केलेल्या आक्रमक खेळीने अनेकांचेच लक्ष वेधले. महेंद्रसिंग धोनी आणि युवीच्या पार्टनरशिपने या सामन्याची रंगत आणखीनच वाढवली. युवीच्या १५० धावांच्या अफलातून खेळीनंतर सर्वांनीच त्याचे शक्य त्या मार्गांनी कौतुक करण्यास सुरुवात केली. चाहत्यांच्या या गर्दीत युवीच्या एका चाहतीने अनेकांचेच लक्ष वेधले. ती चाहती म्हणजे युवीची पत्नी हेजल कीच.

हेजलने युवीच्या या धमाकेदार खेळीनंतर त्याचे कौतुक करत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक मॅसेज लिहिला आहे. युवीच्या फोटोसह लिहिलेल्या कॅप्शनमध्ये हेजलने म्हटले आहे की, ‘भयंकर’ हे त्याच्या नावातील मधले नाव असले पाहिजे होते’, असे लिहित हेजलने अवघ्या काही वाक्यांमध्येच युवीने कॅन्सरला दिलेली टक्कर आणि पुन्हा क्रिकेटचा फॉर्ममध्ये परत येण्याचा त्याचा प्रवासही मांडला आहे. त्यामुळे हेजलचा हा ‘भयंकर’ मॅसेज अनेकांच्याच पसंतीस पडत आहे. हेजल आणि युवी काही महिन्यांपूर्वीच विवाहबद्ध झाले होते. जवळपास आठवडाभर या ‘बिग फॅट पंजाबी वेडिंग’चा उत्साह पाहायला मिळाला होता.

विश्वचषक जिंकल्यानंतर युवराजने कॅन्सरशी लढा देत त्यावर मात केली होती. यादरम्यान त्याला संघातील स्थान गमवावे लागले. कॅन्सरवर मात केल्यानंतर युवीने पुनरागमनासाठी खडतर प्रयत्न केले आणि पाच वर्षे नऊ महिन्यांनी त्याला भारताच्या एकदिवसीय संघात संधी मिळाली. युवीने मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील आजवरची सर्वोत्तम खेळी साकारली. युवराजने इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत दीडशे धावा ठोकल्या. युवराज आणि धोनीने याआधी २०११ सालच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ५० हून अधिक धावांची भागीदारी रचून संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर थेट आज युवी-धोनी ही जोडगोळी क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळाली. दोघांनी तुफान फटकेबाजी करत इंग्लंडसमोर ३८१ धावांचा डोंगर उभारला. युवराजने आपल्या १५० धावांच्या खेळीत २१ चौकार आणि तीन षटकार ठोकले.