हेमा मालिनी यांच्या ‘बियाँड द ड्रिम गर्ल’ या आत्मचरित्राचे काल १६ ऑक्टोबरला त्यांच्या वाढदिवशी अनावरण करण्यात आले. दीपिका पदुकोणने या पुस्तकाचे अनावरण केले. ‘स्टारडस्ट’चे माजी संपादक आणि निर्माता राम कमल मुखर्जी यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या सोहळ्यावेळी हेमा मालिनी यांनी सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल खुलेपणाने चर्चा केली.

त्या म्हणाल्या की, जेव्हा पुस्तकाचे नाव ‘बियाँड द ड्रिम गर्ल’ आहे तर त्या काळातील गोष्टींची चर्चा तर होणारच. लोकांना सनी आणि माझ्यात कशाप्रकारचे नातेसंबंधात असतील याची नेहमीच चर्चा होताना दिसते. पण तुम्हाला सांगू इच्छिते की, जेव्हाही मला गरज लागली मदतीसाठी सर्वात आधी धावून येणारा हा सनी असतो. जेव्हा २०१५ मध्ये माझ्या गाडीचा अपघात झाला होता तेव्हा मला पाहण्यासाठी सर्वात आधी सनीच आला होता. तो सर्वांचीच फार काळजी घेतो. या गोष्टी आमच्यातील नात्याबद्दल खूप काही स्पष्ट करणाऱ्या असल्याचे हेमा मालिनी यांनी सांगितले.

हेमा यांनी १९७९ मध्ये धर्मेंद्र यांच्याशी विवाह केला. धर्मेंद्र यांचे हे दुसरे लग्न होते. याआधी त्यांनी प्रकाश कौर यांच्याशी विवाह केला होता आणि त्यांना चार मुलेही होती. असे म्हटले जाते की, प्रकाश कौर यांना हेमा मालिनी कधीच आवडल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलांनाही हेमा मालिनी फारशा पसंत पडल्या नाहीत. आजपर्यंत कोणीही हेमा आणि सनी- बॉबी यांचे नाते कसे आहे, याबद्दल खुलासा केला नव्हता. पण या पुस्तकाच्या निमित्ताने अनेक नव्या गोष्टी जगासमोर आल्या आहेत.