बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा जितका चित्रपटामुळे चर्चेत असतो, अगदी तेवढाच तो सामाजिक कार्यात देखील सक्रिय असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्याच अनुषंगाने आगामी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटातून अक्की ‘स्वच्छ भारत अभियाना’चा संदेश देताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अक्षय कुमार सध्या होशंगाबादमध्ये आहे. मध्यप्रदेशमधील होशंगाबादमध्ये पत्रकारासोबत बोलताना अक्कीने शौचालयाचा वापर करा, असा संदेश दिला. यावेळी त्याने अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या आजारावर भाष्य केले. १ हजार मुलांचा अतिसरामुळे मृत्यू झाल्याचा दाखला देत त्याने स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. अक्षय कुमार सध्या ‘जॉली एलएलबी २’  चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याचा चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. सध्या ‘जॉली रुलिंग ऑल ओव्हर’ या हॅशटॅगने सोशल मीडिया जॉलीमय झाल्याचे दिसते.

सामाजिक जन जागृतीसाठी अनेक मोठे प्रोजेक्ट राबविण्यात येत असून ‘टॉयलेट एक प्रेम कथा’  हा त्याचाच एक भाग असल्याचे अक्षयने यावेळी सांगितले. भोपाल आणि होशंगाबाद शहरामधील स्वच्छतेचे अक्कीने यावेळी कौतुक देखील केले. याठिकाणी मुंबईपेक्षाही अधिक स्वच्छता आहे, असे तो म्हणाला. आगामी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटात तो झळकणार आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच सेटवरील अनोखे असे छायाचित्र अभिनेता अक्षय कुमारने यापूर्वी पोस्ट केले होते. या चित्रपटात त्याच्यासह ‘दम लगाके हयशा’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर झळकणार आहे. या दोन्ही कलाकारांनी मथुरा येथे सदर चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले आहे. अक्षय कुमारने चित्रपटाच्या सेटवरील एक छायाचित्र पोस्ट केले होते. या छायाचित्रात अक्षय, भूमी आणि त्यांच्या मागे टॉयलेट पाहावयास मिळाले होते. हेच छायाचित्र सध्या ‘जॉली रुलिंग ऑल ओव्हर’  या हॅश टॅगवरुन देखील अक्कीचा चाहता वर्गाने पुन्हा शेअर केले आहे. अक्कीने ज्यावेळी हे  छायाचित्र पोस्ट केले होते. त्यावेळी भूमी आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. ‘टॉयलेट एक प्रेम कथा’च्या सेटवर आहोत असे सांगितले होते.

अक्कीच्या या आगामी चित्रपटाच्या मथुरेमधील चित्रीकरणावेळी स्थानिक नियमांचे पालन न केल्यामुळे अडचणीत वाढणार असल्याची वृत्ते झळकली होती. मथुरा येथील ब्रज भागातील काही चालीरितींविरुद्ध कथानकाचे चित्रण करण्यात आल्यामुळे एका वकिलाने चित्रपटाच्या दिग्दर्शकांविरोधात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला होता.