जम्मू काश्मीर मधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक कलाकार त्यांची मतं व्यक्त करताना दिसत आहेत. दहशतवाद, राजकारण आणि कलाक्षेत्रांमध्ये सध्या सुरु असणाऱ्या असंतोषमय वातावरणाच्या मुद्द्यावरुन अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता नव्यावे भर पडली आहे ती म्हणजे अभिनेत्री जुही चावलाची. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री जुही चावलाने अनेक विषयांवर तिची ठाम मते मांडली आहेत.

‘आपली बुद्धी भ्रष्ट झाली आहे. आपण कोणत्याही समस्येला मुळापासून नष्ट करण्याचा प्रयत्न करतच नाही. इथे सर्वप्रथम लोकांचा विचार करण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे’, असे म्हणत जुहीने पाकिस्तानी कलाकारांच्या प्रकरणावर वक्तव्य केले. ‘आपण नेहमीच महिला सबलीकरणाचा विचार करत असतो. पण फक्त विचार करुन बदल येत नाही. या परिस्थितीत बदल तेव्हाच येईल ज्यावेळी आपण चौकटीपलीकडे जात कोणत्याही गोष्टीबाबत विचार करु. ‘बदल’ हाच अनेक समस्यांवरचा उपाय आहे आणि शिक्षणपद्धतीत बदल के ल्यानंतरच हे साध्य होणार आहे’, असे म्हणत जुहीने बलात्कारांच्या वाढत्या प्रमाणाविषयी तिचे मत मांडले. ‘प्रत्येक मुलाने सर्वप्रथम त्याच्या आईचा, बहिणीचा, पत्नीचा आदर करायला शिकले पाहिजे, त्यानंतर तो आपोआपच इतर महिलांचाही आदर करु शकेल’, असे म्हणत जुहीने तिची भूमिका स्पष्ट केली आहे.